ShivSena | शिवसेना पक्ष नाव,धनुष्यबाण चिन्हं हे उद्धव ठाकरे यांना नाही,तर एकनाथ शिंदे यांच्याकडे, निवडणूक आयोगाचा निकाल
शिवसेनेतून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ४० आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाला, असा वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरु होता. मात्र

मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे ४० आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर, शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्हं कुणाला, असा वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरु होता. सर्वोच्च न्यायालयात आज एकनाथ शिंदे सरकार घटनाबाह्य आहे की नाही यावर देखील युक्तीवाद सुरु होता. मात्र अचानक संध्याकाळी निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्हं आणि पक्षाचं नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला.यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. कारण यामुळे शिवसेना या नावावर आणि धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदे गटाचं आहे, यावर निवडणूक आयोगाकडून शिक्कामोर्तब झालं आहे.
या निर्णयानंतर मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेना समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं आणि हा लोकशाहीचा विजय आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपण पुढे नेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच हा हिंदुत्वाचा आणि सर्वांचा विजय आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हं हातातून गेल्यानंतर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, हा निकाल अपेक्षित होता, कारण हे खोक्यांचं सरकार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलं आहे.तसेच आयोग आणि तपास यंत्रणा कुणाच्या तरी गुलाम असल्यासारख्या वागत असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे कट्टर विरोधक नारायण राणे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे, हा शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे. आमचं जेवढं वाईट करायचं होतं, तेवढं भाजपाने एकनाथ शिंदे यांना हाताशी घेऊन केलं असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या परिवाराला हा सर्वात मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे. कारण आता या ही पहिली शिवसेना असेल जी ठाकरेंशिवाय असेल. शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाचिन्हं दिलं आहे. तसेच धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव देण्याच्या मुद्यावर निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं शिवसेना नेते अनिल देसाई यांनी म्हटलं आहे.
धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर, उद्धव ठाकरे हे आज रात्री ८.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ठाकरे कुटूंबियांकडून शिवसेना निसटल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे बोलणार आहेत, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि धनुष्यबाण हातातून गेल्यानंतर पहिली प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.