बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनीच उद्धव ठाकरेंच्या पदावर मोठं संकट, दिल्लीत काय घडणार?
शिवसेना पक्षासंदर्भातील मागील सुनावणीवेळी आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला आपापलं लेखी म्हणणं आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबईः स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मदिनीच आज शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख पदाची मुदत आज संपतेय. याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीतही राजकीय हालचालींना वेग आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना कुणाची यासंबंधीचा खटला सुरु आहे. त्यातच आज शिवसेना कार्यकारिणी आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत संपतेय. निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार, आज ठाकरे गटातर्फे आयोगासमोर शिवसेनेवर दावा करण्यासंबंधी लेखी म्हणणं मांडलं जाण्याची शक्यता आहे.
आजचा दिवस ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेना पक्षाविषयी सुनावणी सुरु असली तरीही पक्षाच्या कार्यकारिणीची निवडणूक घेऊ द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाने निवडणूक आयोगासमोर केली आहे. आयोगाने अद्याप यावर काहीही उत्तर दिलेलं नाही. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ठाकरे गट आज निवडणूक आयोगाला प्रतिनिधी सभा आणि मुख्य नेता पदाबाबत लेखी म्हणणं पाठवणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशीच शिवसेनेवर वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी ठाकरे गटातर्फे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली जाणार आहे, अशीही माहिती हाती आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयात अद्याप ठोस असा काही निर्णय न झाल्याने ठाकरे गटाकडून ही बैठक घेण्यात येईल, असं सांगितलं जातंय.
आयोगाची सुनावणी कधी?
शिवसेना पक्षासंदर्भातील मागील सुनावणीवेळी आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला आपापलं लेखी म्हणणं आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 30 जानेवारी रोजी आयोगाची सुनावणी आहे. त्यामुळे या तारखेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं आज अनावरण
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिना निमित्त आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे. आज संध्याकाळी मोठा कार्यक्रम घेत तैलचित्राचं अनावरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलंय. मात्र उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून या कार्यक्रमावरून सणकून टीका करण्यात आली आहे.