मुंबई : मध्यंतरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (National President) जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत चालली, असं म्हटलं होतं. त्यावर आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, त्यांनी प्रदेशाध्यक्ष (State President) केलं. त्यांच्या नावात किती कुळे आहेत माहीत नाही. पण त्यांची किती जरी कुळं उतरली तरी ते शिवसेना नष्ट करू शकत नाही. मग ते 52 असतील किंवा 152 असतील. मला काही फरक नाही पडत. प्रादेशिक पक्ष संपवून टाकायचं, हे लोकशाहीला (Democracy) घातक असल्याचं ठाकरे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं प्रदेशाध्यक्ष केले. ते महाराष्ट्र भाजपमय करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी शिवसेना काही संपणार नाही. मग, कितीही कुळे उतरवलीत, तरी चालेल. असंही ठाकरे यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली.
भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी एक वक्तव्य केलं आहे. ते लोकशाहीला घातक आहे की नाही. त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी पक्षाचा प्रमुख आहे. कालपर्यंत मुख्यमंत्री आहे. उद्या पुन्हा शिवसेनेची सत्ता येणारच आहे. हे येणं जाणं सुरूच असतं. पण नड्डा जे बोलले या देशात एकच पक्ष राहणार आहे. बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. विशेषता शिवसेना संपत चालली आहे. बघू, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मार्मिककडे आणि शिवसेनेकडे तरुणाचा ओढा कायम राहिला आहे. व्यंगचित्रकार काय असतो. तो काय करू शकतो याचं जगातील उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर मराठी माणूस आणि हिंदूचं काय झालं असतं हे लक्षात येतं. शिवसेनेची बीजं ही मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने अस्वस्थ मन हेरलं. मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला आणि शिवसेनेने सामनाला जन्म दिला. मी का सांगतोय तर काही लोकांना वाटतं शिवसेना ही उघड्यावर पडलेली वस्तू आहे. कोणीही उचलून घेऊन जाऊ शकतो. तसं नाहीये. शिवसेनेची पाळंमुळं 62 वर्षांपासून आहेत. त्या आधीपासून माझ्या आजोबांनी विचारांची पेरणी केली होती. याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.