पुणे : आगामी लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचत असताना सोशल मीडियावरही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एक जाहीर आवाहन केले आहे. यात त्यांनी आपल्या समर्थकांना आपल्या विरोधी उमेदवारावर टीका करताना भान बाळगण्याचे आवाहन केले आहे. अशाप्रकारे आढळराव यांनी अप्रत्यक्षरित्या अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना कार्यकर्त्यांना संयम बाळगण्यास सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीनिमित्त सोशल मीडियाच्या वापराबाबत काही दिशानिर्देश दिले आहेत. असे असले तरीही राजकीय कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर पातळी सोडून टीका होत आहे. शिरूरमध्येही अशीच स्थिती असून याचा फटका या मतदारसंघातून 15 वर्षांपासून खासदार असलेल्या आढळराव यांनाही बसला आहे. त्यामुळेच त्यांनी सोशल मीडियाच्या वापराबाबत आवाहन केले आहे.
आपल्या आवाहनात आढळराव म्हणाले, ‘निवडणुका देशाचे भविष्य ठरवणाऱ्या आहेत. निवडणुका येतात-जातात मात्र सध्या आपणा सर्वांनाच आपले व्यक्तीगत मत मांडता यावे यासाठी म्हणून सोशल मीडियासारखे माध्यम उपलब्ध होणे हे आपले भाग्य आहे. त्याचा लाभ जरूर घ्या, पण कुणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी आणि कमी वा सत्यता न पडताळलेली माहिती व्हायरल करु नका.’
हे सांगताना आढळराव यांनी आपल्या समर्थकांना विरोधकांच्याबाबतही हा नियम पाळण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘माझ्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा मला माननाऱ्या मतदारांनी ही दक्षता पाळावी. कारण भावनेच्या भरात आपण लिहिलेल्या कोणत्याही पोस्टने कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात, याचे सतत भान असु द्या. आपल्या मतामुळे कुणातही कटुता निर्माण होऊ नये अशी दक्षता घ्या आणि जगातील सुंदर भारतीय संस्कृती जपा.’
दरम्यान स्वतः शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आपले विरोधी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर त्यांच्या जातीवरुन टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. त्यामुळे आढळरावांचे हे आवाहन त्यांच्या समर्थकांसह ते स्वतः किती पाळणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.