शिवसेनेत बंडाळी, आमदार राजन साळवींना शिवसैनिकांचा विरोध
शिवसेनेतील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आलाय. या मतदारसंघातून राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. साळवी यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली.
रत्नागिरी : नाणार रिफायनरीला विरोधाच्या बंडानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय बंडाला सुरुवात झाली आहे. याच मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार राजन साळवींना (MLA Rajan Salvi) शिवसैनिकांच्या बंडखोरीचा सामना करावा लागतोय. शिवसेनेतील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आलाय. या मतदारसंघातून राजन साळवी (MLA Rajan Salvi) यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. साळवी यांच्यावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली.
राजन साळवी 2009 आणि त्यानंतर 2014 ला राजापूर मतदारसंघातून विजयी झाले. पहिल्यांदा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध आणि त्यानंतर नाणार रिफायनरी विरोधातील बंड यामुळे राजन साळवी हे जगाच्या नकाशावर पोहोचले. पण प्रकल्पांच्या विरोधात बंडाची हाक देणाऱ्या राजन साळवींना ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याच पक्षातील शिवसैनिकांच्या नाराजीला सामोरं जावं लागतंय.
शिवसेनेतील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे. आमदार राजन साळवी यांच्या कार्यपद्धतीवर आमची प्रचंड नाराजी असून त्यांना उमेदवारी न देता अन्य कोणालाही संधी देण्यात यावी अशा मागणीचं निवेदन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन देण्यात आलंय.
उद्धव ठाकरेंना दिलेल्या पत्रातील मुद्दे
- राजन साळवी यांनी पक्षाशी गद्दारी केली, निवडणुकीत राणेंना मतद केली
- 2004 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतद केली नाही
- 2009, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंना मदत
- राजापूर नगरपरिषद पोटनिवडणुकीत आर्थिक तडजोड केली
- उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, उपसभापती श्रीकांत कांबळे, तसेच विभागप्रमुख, विभागसंघटक, पंचायत समिती सदस्य, काही सरपंच यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांच्या सह्या
राजन साळवी हे राजापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभेवर जाण्याच्या तयारीत आहेत. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजन साळवी विरुद्ध नाराज शिवसैनिक असा सामना रंगलाय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक आमदार द्या अशी मागणी राजापूरमधल्या नाराज शिवसैनिकांनी केली होती.
राजन साळवी हे मूळ रत्नागिरी शहरातील आहेत. 2014 नंतर आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर राजन साळवी यांच्याविरोधात नाराजीचा सूर आळवला गेलाय. मात्र या बंडाला विशेष महत्व नसेल असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. कोकणातला शिवसैनिक आदेश मानणारा आहे, त्यामुळे आजपर्यंत या आदेशाच्या पलिकडे जाण्याचं धाडस कुठल्याच शिवसैनिकांनी केलं नाही. त्यामुळे याचा फारसा परिणाम कोकणातल्या राजकारणावर होणार नसल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडलंय.
राजापूर विधानसभा मतदारसंघात नाणार प्रकल्पाच्या बाजूने असणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सलग तीन टर्म आमदार राजापूर मतदारसंघातून आजपर्यंत निवडून आलेला नाही. त्यामुळे शिवसेनेची ही खदखद नजर अंदाज करणं देखिल राजन साळवी यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला भारी पडू शकतं.