मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं आज अपघाती निधन झालंय. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वर्तुळाची हानी झाल्याची हळहळ सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय. मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान विनायक मेटेंचं (Vinayak Mete) निधन झालं आहे. मेटे यांनी मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली. त्यांचं राजकीय जीवनही चर्चेचा विषय राहिला. त्यांचं सामाजिक क्षेत्रातील योगदान आणि राजकीय कारकीर्द जाणून घेऊयात…
विनायक मेटे हे मूळचे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील. त्यांचं बालपण केज तालुक्यातील राजेगावात गेलं. शालेय जीवनापासूनच त्यांना सामाजिक आणि राजकीय जीवन खूणावत होतं. मराठा महासंघाच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी सामाजिक क्षेत्रात पाऊल ठेवलं. 1994 साली त्यांनी युतीला पाठींबा दिला होता. सेना-भाजप युतीची सत्ता आल्यानंतर मेटेंना विधानपरिषदेचं तिकीट देण्यात आलं.
विनायक मेटेंना सेना-भाजप युतीने विधान परिषदेवर घेतलं खरं पण काहीच दिवसात त्यांच्यात खटके उडायला लागले. मेटे युतीतून बाहेर पडले अन् त्यांनी महाराष्ट्र लोकविकास पार्टी हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन केला. अन् पुढे राष्ट्रवादीकडून विधीमंडळात गेले. दोनदा विधानपरिषदेचे आमदार राहिले.
2014 ला केंद्रात मोदी सरकार सत्तेत आलं. तेव्हा विनायक मेटे पुन्हा महायुतीचा भाग झाले. आमदार झाले.
विनायक मेटे कायम सत्ते असणारे राजकारणी होत. जेव्हा सेना-भाजपची युती सत्तेत होती तेव्हा मेटे युतीचा भाग होते. आघाडीची सत्ता येताच ते राष्ट्रवादीसोबत गेले. पुढे मोदी लाटेत ते पुन्हा युतीचा भाग झाले. त्यामुळे विनायक मेटे यांना सत्तेचे मानचे ‘मानकरी’ म्हटलं तरी वावगं ठरू नये.
मराठा समाज आपल्या न्याय, हक्कांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला. कोणताही राजकीय नेता आम्हाला आमचा लिडर नको म्हणत मराठा समाजाने आंदोलन पुकारलं. लाखोंचे मोर्चे निघाले. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमुन निघाला. या शिस्तबद्ध मोर्चांचा एकच नेता होता, तो म्हणजे सर्वसामान्य मराठा! पण कालांतराने परिस्थिती बदलली.मोर्चेकरांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हळूहळू एक-एकजण पुढे येऊ लागलं. पाहता-पाहता विनायक मेटे यांनी नेतृत्व करायला लागले अन् पाहता-पाहता विनायक मेटे मराठा समाजाच्या आंदोलनाचा आवाज बनले…
2017 ला झालेल्या बीडम नगरपालिका निवडणुकीमध्यये मेटेंच्या शिवसंग्रामच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मात्र त्यांनी विजय खेचून आणला. जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद तसंच बीड पंचायत समितीमध्ये शिवसंग्रामला आपलं वर्स्व निर्माण करता आलं. पण पुढे काहीच दिवसात चारही जिल्हा परिषद सदस्य आणि तीन पंचायत समिती सदस्यांनी मेटेंचा हात सोडला.