ठाकरे गटाच्या नेत्यांवर वॉच? iPhone वापरण्याच्या सूचना? अंबादास दानवे म्हणाले, माझ्या कॉल रेकॉर्डिंग…
कोण नेते कुठे जातात, यावर नजर ठेवली जातेच. राज्य सरकार निश्चित दबाव टाकत आहेत. याला नोटीस दे, त्याच्यावर गुन्हा दाखल कर... हेच धंदे आहेत, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय.
संतोष जाधव, औरंगाबादः महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या नेत्यांना विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आयफोन (IPhone) वापरण्याच्या सूचना देण्यात आल्याचं म्हटलं जातंय. सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वॉच ठेवला जातोय, मोबाइल ट्रेस केले जातायत अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या फक्त चर्चा आहेत. आमच्यावर दबाव असला तरीही आम्ही कुणालाही घाबरत नाहीत. मी विरोधी पक्षनेता म्हणून तसेच ठाकरे गटाचा कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी काम करतो. कुणाला हव्या असतील तर मी स्वतः माझ्या ऑडिओ क्लिप देतो, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलंय.
अंबादास दानवे काय म्हणाले?
ठाकरे गटाच्या नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना आहेत, या चर्चांना अंबादास दानवे यांनी फेटाळून लावलंय. ते म्हणाले, ‘ अशा कोणत्याही सूचना नाहीत. राज्य सरकारची यंत्रणा आमच्यावर नजर ठेवून असते. एकमेकांना ही यंत्रणा निरोप देत असते. पण आम्ही त्याला घाबरत नाहीत. खुल्या दिलानं काम करतो…
कोण नेते कुठे जातात, यावर नजर ठेवली जातेच. राज्य सरकार निश्चित दबाव टाकत आहेत. याला नोटीस दे, त्याच्यावर गुन्हा दाखल कर… हेच धंदे आहेत. मात्र याची भीती शिवसैनिकाच्या मनात नाही. कुणीही गुन्हे दाखल करो.. फोन रेकॉर्ड करो, याने आम्हाला फरक पडत नाही..
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला कधीही अटक होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. यावरून अंबादास दानवे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांविरोधात अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची ही भीती रास्त आहे…
विरोधी पक्ष नेत्यावर सरकारची नजर असतेच, मात्र मोबाइलची ट्रेसिंग होतेय.. असं नाही. करायची असेल तर मीच माझे कॉल रेकॉर्डिंग देतो, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.