शिवसेना-भाजप विधानसभा-लोकसभा एकत्रच लढणार : अमित शाह
नवी दिल्ली : मित्रपक्ष सोबत न आल्यास ‘पटक देंगे’ म्हणणाऱ्या भाजपाध्यक्ष अमित शाहांनी एक पाऊल मागे घेतलंय. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांची युती होईल आणि विधानसभा-लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रच लढू, असा दावा अमित शाह यांनी केलाय. ‘मित्रपक्ष सोबत आला तर ठिक, नाही तो पटक देंगे’, असं अमित शाह लातूरमधील कार्यक्रमात म्हणाले होते. विशेष म्हणजे देशात […]
नवी दिल्ली : मित्रपक्ष सोबत न आल्यास ‘पटक देंगे’ म्हणणाऱ्या भाजपाध्यक्ष अमित शाहांनी एक पाऊल मागे घेतलंय. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांची युती होईल आणि विधानसभा-लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रच लढू, असा दावा अमित शाह यांनी केलाय. ‘मित्रपक्ष सोबत आला तर ठिक, नाही तो पटक देंगे’, असं अमित शाह लातूरमधील कार्यक्रमात म्हणाले होते.
विशेष म्हणजे देशात जे महागठबंधन होतंय, त्याचा फायदा भाजपलाच होईल, असा दावाही अमित शाहांनी केलाय. 2014 पेक्षाही जास्त जागा घेऊन एनडीए सत्तेत येईल, असं ते म्हणालेत. 2014 च्या निवडणुकीत एकट्या भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएतील मित्रपक्षांसह हा आकडा साडे तीनशेच्या आसपास होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातूनच लढणार असल्याचंही अमित शाह यांनी स्पष्ट केलंय. नरेंद्र मोदींनी 2014 ला गुजरातमध्ये त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आणि वाराणसी या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळवला होता. यावेळीही ते बनारस म्हणजेच वाराणसीतून लढतील, असं शाह यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे भाजपचाच भाग असल्याचंही अमित शाहांनी म्हटलंय. भाजपच्या पाठिंब्यावर नारायण राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवाय त्यांचा जाहीरनामा समितीमध्येही समावेश करण्यात आलाय. राणे आणि शिवसेनेचं वैर नवं नाही. पण राणे भाजपचाच भाग असल्याचं अमित शाहांनी म्हटलंय.
युतीवर भाजप-शिवसेना नेत्यांचे वक्तव्य
युतीवर अजून कोणताही ठोस निर्णय दिला नसला तरी भाजपकडून युतीचा आशावाद बोलून दाखवला जात आहे. शिवसेनेकडून युती होणार नसल्याचं म्हटलं जातंय, तर भाजपकडून युतीचा दावा केला जातोय. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीचा आशावाद बोलून दाखवला. तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही युतीचा आशा व्यक्त केली. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युतीची शक्यता फेटाळली आहे.