मुंबई : खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पाळत ठेवण्यात येत आहे, असा आरोप करत आजच्या सामनातून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय. भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे? या देशात आमच्याशिवाय दुसरा कोणीच राहता कामा नये याच मार्गाने ते प्रवास करीत असतील तर त्यांना हा देश व जनतेचे मानस नीट समजलेले दिसत नाही. आजही अशा कठीण परिस्थितीशी बेडरपणे ‘सामना’ करणारे लोक आहेत, असं सामनात म्हटलंय. (Shivsena Criticized Modi Govt over Trunmul Congress MP Mahua Moitra)
ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, पंजाबचे बादल, शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत असे अनेक लोक बेडर होऊन संघर्ष करीत आहेत. सरकारकडे पाळत ठेवण्याची यंत्रणा असल्याने ‘सामना’ थांबणारा नाही. महुआ यांच्यावर पाळत ठेवून सरकारने स्वतःची दुर्बलता उघड केली. एका महिलेला सरकार घाबरले हेच आता स्पष्ट झाले आहे. हुकूमशाही ही सगळ्यात जास्त डरपोक असते हे पुन्हा सिद्ध झाले. महुआ मोईत्रा यांनी त्यांचा बुरखा फाडला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या झुंजार खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. ”पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?” असा प्रश्न श्रीमती महुआ यांनी विचारला आहे. महुआ या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. त्या प. बंगालातून प्रथमच निवडून आल्या, पण एखाद्या अनुभवी खासदारास मागे टाकतील अशी संसदीय झुंज त्या लोकसभेत देत आहेत.वाघिणीला (ममता बॅनर्जी) साजेशी सहकारी म्हणून आम्ही महुआकडे पाहतो.
लोकसभेत व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत या झुंजार वाघिणीने मोदी सरकारला अनेकदा घाम फोडला आहे. त्यामुळेच तिला वेसण घालण्यासाठी नको असलेली सुरक्षा व्यवस्था देऊन पाळत ठेवली जात आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत देशाच्या न्यायव्यवस्थेचा बुरखा फाडणारे भाषण केले. महुआ यांनी काय सांगितले? न्यायव्यवस्था आता पवित्र नाही (काल न्या. रंजन गोगोई यांनीही नेमके तेच सांगितले). केंद्र सरकार म्हणजे अफवा, चुकीची माहिती पसरविणारा फुटीर उद्योग झाला आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला करताना सांगितले, ”काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात.” यावर भाजप जाम भडकला आहे. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राममंदिरासंदर्भात निकाल दिल्याचा आरोप महुआ यांनी केला.
महुआ यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर जोरदार भाषण झाले व अर्थव्यवस्थेपासून कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्यांवर त्यांनी सरकारची बोलती बंद केली, पण सरकारची बोलती बंद झाली तरी त्यांच्या हाती पोलीस, सीबीआय, गुप्तचर व्यवस्था आहे व त्यांचा वापर करून राजकीय विरोधकांवर पाळत ठेवली जात आहे वा ‘ईडी’चा फटका मारुन घायाळ केले जात आहे. हा विषय एकट्या महुआपुरता मर्यादित नाही. विरोधी पक्षांतील इतर अनेकांना नामोहरम करण्यासाठी याच तंत्राचा वापर केला जात आहे.
अनेकांचे फोन रेकाॅर्ड केले जात आहेत, ई-मेल्स चोरुन वाचले जात आहेत. हे फक्त विरोधी पक्षांपुरतेच मर्यादित नाही. सत्ताधारी पक्षातील प्रमुख लोक, मंत्री, त्यांच्या कुटुंबांवर एक प्रकारचे दडपण आहे. राजकीय वातावरणातला खुलेपणा संपला आहे. देशाच्या राजधानीचे वातावरण गुदमरल्यासारखे झाले आहे. सरकार पक्षातील अनेकांनाही महुआप्रमाणेच भीती वाटत आहे. कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, फोन ऐकले जात आहेत. सत्ताधारी पक्षाचे लोक संसद काळात विरोधी पक्षांच्या खासदारांशी बोलायला घाबरतात. कुणी पाहिले तर राजकीय किंमत चुकवावी लागेल असे त्यांना वाटते.
सामाजिक, राजकीय वातावरणात एक प्रकारची मूकबधिरता आली आहे व महुआ यांनी त्याच गुदमरलेल्या वातावरणाचा स्फोट केला आहे. महुआ यांनी स्पष्ट केले आहे की, “मी बेडर आहे. सर्व संकटांशी सामना करण्यास सक्षम आहे. मी कधीही पोलीस सुरक्षा मागितलेली नाही, तरीही माझ्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी अचानक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठीच हे सर्व सुरू आहे”. सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान महुआ मोईत्रा यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले.
”देशाच्या नागरिकांना स्वतःचे खासगीपण जपण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असून तो मला जपायचा आहे,” असे महुआ यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना कळवले आहे. महुआ यांना अशा प्रकारे जेरबंद करून वाघिणीचे गुरगुरणे व गर्जना थांबणार आहे काय? राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा घणाघात महुआने केला. प. बंगालची स्थिती भाजपने चिंताग्रस्त केली आहे. काही करून प. बंगाल जिंकायचेच असा विडा या मंडळींनी उचलला आहे व त्यासाठी संपूर्ण तृणमूल काँग्रेसला फोडण्याची योजना दिसत आहे.
(Shivsena Criticized Modi Govt over Trunmul Congress MP Mahua Moitra)
हे ही वाचा :
VIDEO: अरुण बेकसूर हाये… त्याच्यावरचे आरोप खोटे हाय; अरुण राठोडच्या आईचा टाहो
Video: “सदर मतदारसंघातील पोलीस हे रावळांच्या ठेवलेल्या XXX…” , गोटेंची भाषा घसरली, गुन्हा दाखल