मुंबई: राज्यात महाविकासआघाडी असली तरी सध्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (Shivsena) दिलेला कोणताही शब्द पाळत नाही. काँग्रेसला कोणत्याही निर्णयात सामील करुन घेतले जात नाही. शिवसेनेकडून सर्व निर्णय एकहातीच घेतले जातात, असा आरोप पालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला. (congress leader Ravi Raja criticised shivsena)
रवी राजा यांनी शनिवारी मुंबईत ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर परखडपणे भाष्य केले. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिली. मात्र, शिवसेना पालिकेतही दिलेला शब्द पाळत नाही. काँग्रेसला कोणत्याही निर्णयप्रक्रियेत सामील करून घेतले जात नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावरच लढवावी, असे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे रवी राजा यांनी सांगितले. यावर आता शिवसेनेचे नगरसेवक यावर काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहल्याने आता शिवसेना बॅकफूटवर गेल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सोनिया गांधी यांचं पत्रं हा दबाव तंत्राचा भाग नाही. सोनिया गांधी या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या प्रमुख आहेत. राज्यातलं आघाडी सरकार अस्तित्वात आलं तेव्हा किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता. त्याविषयीचे काही मुद्दे त्यांनी पत्राद्वारे मांडले आहेत. याचा अर्थ हा दबावतंत्राचा भाग आहे, असं समजण्याचं कारण नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
मुंबई महानगरपालिका आणि बेस्टचे कोणत्याही परिस्थितीत खासगीकरण होऊ देणार नाही, हे काँग्रेसने आधीच स्पष्ट केले आहे. बेस्टच्या भाडेतत्त्वावरील गाड्यावर खासगी कंडाकटर ठेवण्याचा प्रस्ताव आला आहे. मात्र, या गोष्टीला आमचा विरोध आहे. हा बेस्ट संपवण्याचा प्रकार आहे. बेस्टचे खासगीकरण करण्यासाठीचे हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया रवी राजा यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या:
महाविकास आघाडी सरकार गॅसवर; आशिष शेलार यांचा दावा
सोनिया गांधींचं पत्रं म्हणजे दबावतंत्र नाही, राऊतांची सावध प्रतिक्रिया; शिवसेना बॅकफूटवर?
(congress leader Ravi Raja criticised shivsena)