नांदेड : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Pandharpur By Poll Result) निकालानंतर महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसून येत आहे. नांदेडमधील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नांदेडमधील देगलूरच्या (Deglur) पोटनिवडणुकीचं तिकीट न दिल्यास भाजपचा झेंडा हाती धरण्याचा अप्रत्यक्ष इशारा साबणेंनी दिला आहे. (Shivsena Former MLA Nanded Deglur Subhash Sabane warns to join BJP)
नांदेडमधील देगलूर मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे गेल्या महिन्यात कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी होणाऱ्या पोट निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय अंतापूरकर यांच्या मुलाला पोटनिवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितलं आहे.
दुसरीकडे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे. देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी, अशी मागणी साबणे यांनी केली आहे.
सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.
सामान्यांचा आणि तळागाळात जाऊन काम करणारा नेता म्हणून रावसाहेब अंतापूरकर यांची ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबई महाराष्ट्र विद्युत मंडळ दक्षता विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. 2009 मध्ये त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर रावसाहेब अंतापूरकर यांनी देगलुर-बिलोली मतदारसंघातून निवडणूक लढवली. यामध्ये त्यांनी बाजी मारली. तर 2019 मध्येही रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणेंचा पराभव केला होता.
कोरोनाच्या काळातही त्यांच्या कामात खंड पडला नव्हता. अगदी शेती- बांध्यावर, वाडी-तांड्यावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते. अशातच त्यांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाल्यामुळे एक हळव्या मनाचा आमदार आपल्यापासून हिरावला गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
पंढरपुरातील पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत
आता साबणे यांनी उमेदवारीसाठी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा इशारा दिल्याने नांदेडच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पराभवाचे हादरे नांदेडपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन
जी सीट बापानं तीनदा जिंकली, ती पोराला का जिंकता आली नाही? भगीरथ भालकेंच्या पराभवाची 5 कारणं
(Shivsena Former MLA Nanded Deglur Subhash Sabane warns to join BJP)