युतीत येण्यासाठी मलाही शिवसेनेची ऑफर, बच्चू कडूंचा दावा
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकीय भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज आमदार बच्चू कडू आणि युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील भेटीने चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अनेक राजकीय भेटीगाठी होत आहेत. त्यातच आज आमदार बच्चू कडू आणि युवासनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील भेटीने चर्चेला उधाण आले आहे. स्वतः बच्चू कडू यांनी आपल्याला शिवसेनेने ऑफर दिल्याची माहिती टीव्ही 9 मराठीला दिली.
बच्चू कडू आणि आदित्य ठाकरे यांची भेट सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयात झाली. यावेळी शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव आल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हीही मित्र पक्षांचा शोध घेत असल्याची शिवसेनेची भूमिका असल्याचेही सांगण्यात येत आहे. असे असले तरी आपण शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही बच्चू कडू यांनी नमूद केले.
भाजप आणि शिवसेनेने विधानसभेपूर्वी युती केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कुणाचा असणार यावरुन कलगीतुरा सुरु आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री आमचाच असणार असे म्हणत दंड थोपटले आहेत. मात्र, त्यासाठी संख्याबळ जमवण्यासाठीही शिवसेनेचे प्रयत्न आहेत. म्हणूनच शिवसेना नव्या मित्रपक्षांच्या शोधात आहे. आमदार बच्चू कडू हे लढवय्ये आणि गरिबांचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची सोबत मिळाल्यास शिवसेनेला फायदा होईल, असाही आडाखा शिवसेनेकडून बांधला जात आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात बच्चू कडू काय निर्णय घेतात आणि शिवसेना अजून कोणत्या नव्या मित्रपक्षांना सोबत घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.