माझी आणि तावडेंची चौकशी करा, बोगस डिग्री प्रकरणी उदय सामंतांचं ओपन चॅलेंज
'ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही' असं स्पष्ट मत उदय सामंत यांनी 'टीव्ही9 मराठी'शी बोलताना व्यक्त केलं
रत्नागिरी : महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचा आरोप केला जात आहे. पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांच्या आरोपानंतर शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. माझी आणि माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची चौकशी करा, असं खुलं आव्हान सामंत यांनी (Uday Samant on Bogus Degree) दिलं.
‘ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही’ असं स्पष्ट मत उदय सामंत यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना व्यक्त केलं. ‘1991 मध्ये मनोहर आपटे यांनी ही संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जायचं. त्याची डिग्री दिली जायची, तशी मी घेतली. त्या डिग्रीचा फायदा घेऊन कुठलं शासकीय घर घेतलं नाही. त्याचा शासकीय लाभ घेतला नाही’, असा दावाही उदय सामंत यांनी केला.
ज्यांनी हे प्रकरण प्रकाशझोतात आणलं, त्यांचा हेतू काय हे तपासण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही उदय सामंत म्हणाले. प्रॅक्टिकल अभ्यास करुन व्यवसाय सुरु करण्यासाठी मी तिथे शिकलो. त्यामुळे आता 27 वर्षांनंतर मला मानसिक त्रास मला होतो. अशी विद्यापीठं असतील, जिथे वेगळं काही होत असेल तर त्याची नक्की चौकशी होणार असल्याचंही उदय सामंत यांनी सांगितलं.
राज्याच्या नव्या उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे बोगस पदवी, आरटीआय कार्यकर्त्याचा दावा
आम्ही निवडणूक आयोगाला किंवा सरकारला फसवलेलं नाही. त्यामुळे विरोधीपक्षातील विनोद तावडे आणि माझीसुद्धा चौकशी करावी असं खुलं आव्हान उदय सामंत यांनी दिलं. मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातील पदवीमुळे माजी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप हे त्यावेळी टीकेचे लक्ष्य झाले होते.
उदय सामंत यांनी अभियांत्रिकी शाखेचे पदविकाधारक (डिप्लोमा) असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. राज्य मंडळाची बारावीची परीक्षा मार्च 1991 मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी डिसेंबर 1995 मध्ये पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले. ऑटोमोबाइल अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविकेचे शिक्षण त्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून पूर्ण केले आहे. हे विद्यापीठ अनधिकृत आहे.
राज्यात अशी विद्यापीठं लोकांना फसवण्यासाठी तयार झाली असतील, तर त्याची नक्की चौकशी होणार, असा इशाराही सामंत यांनी दिला. मला थांबवण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र असल्याचा दावासुद्धा उदय सामंत (Uday Samant on Bogus Degree) यांनी केला.