Balasaheb Thackeray Memorial | भूमिपूजन सोहळ्याचे छापील आमंत्रण कोणालाही नाही, आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार : अनिल परब
हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असेही अनिल परब म्हणाले. (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial)
मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला कुणाला आमंत्रण आहे की नाही, हे मला माहिती नाही. आम्हीही हा कार्यक्रम ऑनलाईन बघणार आहोत, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरुन शिवसेनेवर टीका केली जात आहे. यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony Invitation)
हे स्मारक नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान
शिवसैनिकांसाठी शिवजयंती म्हणजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पुजाच आहे. त्यासोबतच आमचे दुसरे दैवत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं ही आज भूमिपूजन होत आहे. त्यामुळे ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांच्या या वास्तूमुळे त्यांचा संपूर्ण इतिहास महाराष्ट्राच्या जनतेलाही कळणार आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बाळासाहेबांचे भव्य स्मारक होऊ घातलं आहे. हे स्मारक म्हणजे आमच्यासाठी स्मृतिस्थान आहे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे, असेही अनिल परब म्हणाले.
कोण काय सांगते त्याला महत्त्व नाही
“बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याचे कुणाला आमंत्रण आहे वा नाही हे माहीत नाही. पण हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. आम्ही देखील हा कार्यक्रम ऑनलाईनच बघणार आहोत. त्यामुळे कोण काय सांगते त्याला महत्त्व नाही. ज्यांना जे बोलायचे ते बोलू दे, माझ्यासारखा शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांनी घडला आहे. त्यामुळे कोण काय बोलतो त्याला आम्ही महत्त्व देत नाही,” असेही अनिल परब यांनी सांगितले. (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony Invitation)
छापील आमंत्रण कोणालाही नाही
“आजचा कार्यक्रम ऑनलाईन आहे. शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मंत्र्यांना आमंत्रण दिलेले आहे. छापील आमंत्रण कोणालाही देण्यात आलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे,” असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले.
सुनियोजित आराखडा तयार केला जाणार
“बाळासाहेबांच्या स्मारकाचा आराखडा जनतेच्या समोर ठेवला जाईल. यावेळी बाळासाहेबांच्या विचारांच्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवल्या जातील. त्यानुसार सुनियोजित आराखडा तयार केला जाईल,” असेही ते म्हणाले.
आज भूमिपूजन
बाळासाहेबांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री कार्यालयाने मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमाची माहिती दिली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळयास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यानंतर संध्याकाळी 5.00 वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थितीत राहणार आहेत (Anil Parab On Balasaheb Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony Invitation)
संबंधित बातम्या :
राज ठाकरेच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, भूमिपूजन कोण करतं याला महत्त्व नाही; मनसेचा टोला