“भाजपच्या ‘या’ नेत्याकडून सातत्याने युती तोडण्याचा प्रयत्न”, शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपली युती असावी. आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलो आहोत, असेही शिवसेना नेत्याने सांगितलं.
Ramdas Kadam On Ravindra Chavan : अवघ्या काही महिन्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. सध्या महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. त्यातच आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आता महायुतीचे घटक पक्ष शिवसेना-भाजपाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. यावेळी त्यांनी रविंद्र चव्हाणांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करत आहे, असाही घणाघात रामदास कदम यांनी केला.
शिवसेना नेते रामदास कदम यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी Exclusive संवाद साधला. यावेळी त्यांनी रविंद्र चव्हाण यांचं डोकं ठिकाण्यावर नाही. त्यांची तात्काळ हकालपट्टी करा. ते युती तोडण्याचे काम करत आहे, अशी मागणी रामदास कदम यांनी केले आहे.
“कोकणवासियांनी काय पाप केले?”
“रविंद्र चव्हाण यांना युतीचं भान नाही. रविंद्र चव्हाण यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री हे खातं सांभाळण्याची लायकी आणि औकात दोन्हीही नाही. गेले १४ वर्ष मुंबई-गोवा महामार्गाचा वनवास आम्ही कोकणवासीय भोगत आहोत. या रविंद्र चव्हाणांनी अनेक आश्वासन दिली. गेल्या गणपतीत सांगितलं होतं की पुढच्या गणपतीला कोणतीही अडचण येणार नाही. पण आज आपण पाहिलं तर मुंबई-गोवा महामार्ग जसा आहे तसाच आहे. तीन वर्षात समृद्धी महामार्ग होतो, मग आमच्या कोकणवासियांनी काय पाप केले आहे?” असा प्रश्न रामदास कदम यांनी उपस्थित केला.
“रविंद्र चव्हाण हे पागलसारखे बडबडत आहेत. याचे डोकं ठिकाण्यावर नाही. भुंकणार कुत्रा कधी चावत नाही, याची मला जाणीव आहे. पण अशा भुंकणाऱ्या कुत्र्यावर लक्ष द्यायला आम्हाला वेळही नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात मी नरेंद्र मोदी, अमित शाह यांना लेखी तक्रार केली आहे. हा माणूस पागल झाला आहे. याला युती तोडायची आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी मी केली आहे”, असेही रामदास कदम म्हणाले.
“…तर महाराष्ट्राचा विकास कसा होईल?”
“रविंद्र चव्हाण हे सातत्याने युती तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी 15 दिवसांपूर्वीच मोदी-शाह यांना पत्र पाठवलं आहे. माझी प्रामाणिक इच्छा आहे की आपली युती असावी. आम्ही विश्वास ठेवून तुमच्यासोबत आलो आहोत. रविंद्र चव्हाण हे दापोली मतदारसंघात माझ्या मुलालाही प्रचंड त्रास देत आहेत. मुंबई-गोवा महामार्ग जसा आहे तसाच आहे. तू एक मंत्री आहेस आणि कोणाला काय बोलतो, याचं भान त्याला आहे का? असे मंत्री असतील तर महाराष्ट्राचा विकास कसा होईल?” असा प्रश्नही रामदास कदम यांनी उपस्थित केला.
“मी शिवसेनचा जबाबदार नेता”
“गेली १४ वर्ष आम्ही वाट पाहतोय, अजून किती वर्ष आम्ही वाट पाहायची. मी आज सकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पेणपासून राजापूरपर्यंत प्रवास करुन दाखवावा, म्हणून जीव जळतोय. मी शिवसेनचा जबाबदार नेता आहे. त्यामुळे मला सर्वच गोष्टी बोलता येणार नाही. मी सर्व गोष्टी पत्रात नमूद केल्या आहेत. याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करेन आणि त्यानंतर जर मला वाटलं तर मी तुम्हाला ते पत्र देईन”, असे रामदास कदम म्हणाले.