मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचा संसर्गाचा वेग थोडा नियंत्रणात आला आहे. तरी तिसऱ्या लाटेची भीती ही आहेच. मात्र, हे कोरोना संकट सुरु असताना महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना देखील वेग आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे प्रचंड घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात खरंच पुन्हा एकदा राजकीय भूकंप वगैरे घडणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात सतावताना दिसतोय. कारण शिवसेना नेते संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय (Maharashtra Political Happenings latest).
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एकंदरीत ज्या घडामोडी घडत आहेत ते पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत अगदी तशीच प्रतिक्रिया दिलीय. सध्या कुणीही कुणाची भेट घेतो. त्यामुळे काहीही घडू शकतं, असं राज ठाकरे म्हणाले होते. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींना देखील आता वेगळं वळण लागलं आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडू शकतं? याबाबत राजकीय विश्लेषकांचे वेगवेगळे अंदाज आहेत (Maharashtra Political Happenings latest).
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमेकांप्रती काही गैरसमज, विसंवाद आहेत का? किंवा एकमेकांप्रती काही असुरक्षिततेची भावना आहे का? कारण ही दोन्ही नेते भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटले आहेत. शरद पवार हे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गुजरातमध्ये गोपनीयरित्या भेटले. ही बैठक दोन महिन्यापूर्वी झाली. तर उद्धव ठाकरे हे उघडपणे शासकीय कामानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. तसेच तिथे त्यांची मोदींसोबत व्यक्तीगत भेट देखील झाली. ती भेट जवळपास अर्धा तास झाली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचा अंदाज बांधला जात आहे.
दुसरीकडे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी शिवसेना हा धोका देणारा पक्ष नाही, असं विधान केलं. तर शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचं नाव न घेता काँग्रेस नेत्यांना टोला लगावला होता. महाविकास आघाडीत ही एकमेकांप्रती असुरक्षिततेची भावना दिसत आहे. विशेषत: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात ही भावना आहे का? ती मिटवण्यासाठी संजय राऊत हे प्रयत्न करत आहेत का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.
कदाचित पुढच्या काही दिवसात संजय राऊत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात भेट घडवून आणतील. त्याचाच एक भाग शरद पवार यांचा निरोप घेऊन संजय राऊत हे गेल्या शनिवारी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यानंतर आज पुन्हा एकदा ते ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेटले. त्यानंतर ते पुन्हा एकदा शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी गेले. तिथे ते पवारांसोबत 15 ते 20 मिनिट बातचित करतात. त्यानंतर ते ‘सिल्वर ओक’मधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्ष टिकेल, असं शरद पवार म्हणाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली. या सर्व घडामोडी महाविका आघाडीत खरंच आलेबल नाही, हेच दर्शवताना दिसत आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
“सहज भेटलो. काहीही राजकीय चर्चा नाही. पण त्यांना मी सहज भेटलो. काहीही घडामोडी घडली नाही. जो निरोप असेल तो तुम्हाला कशाला सांगेल? त्यांनाच सांगेल. काल आपण शरद पवार यांचं बोलणं ऐकलं. त्यांनी हे सरकार पाच वर्ष टिकेल. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चांगलं काम सुरु आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत”, अशी प्रतिकिया संजय राऊत यांनी माध्यमांना दिली.
या घडामोडींमधून एकच बोध कळतो की पड्यामागून नक्कीच काहीतरी सुरु आहे. भाजपबरोबर जाण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरु आहे का, त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस स्वबळाचा नारा देत आहे का? या सगळ्या घटना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या आहेत. भलेही नेते कितीही दावा करत असले तरी पडद्यामागे नक्कीच काहीतरी घडत आहे. या सगळ्याचा फायदा घेण्यासाठी भाजप व्ह्यूरचना आखत असण्याची शक्यता आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणात यांसारख्या घडामोडी घडत राहणार आहेत. अधिवेशन जवळ आलेलं आहे. त्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड हा एक कळीचा मुद्दा असू शकतो. काँग्रेस पक्षाला आपलं पद सोडायचं नाही. काँग्रेसचा आग्रह आणि दोन्ही पक्षांना या पदासाठी असणारी महत्त्वकांक्षा त्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी घडू शकतात. संजय राऊत शरद पवार यांची समजूत करण्याचा प्रयत्न करत असतील. किंवा त्यांचे दूत म्हणूनच ते काम करत आहेत”, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी दिली.
“राज्यातील सरकारमधील जी चर्चा सुरु आहे, या सगळ्या गोष्टी विधानसभा अध्यक्षच्या निवडणुकीत दिसेल. ही निवडणूक पुढे ढकलली जावी, असा शिवसेना-राष्ट्रवादीचा आग्रह असेल. तर काँग्रेसचा निवडणूक व्हावा, असा आग्रह असू शकतो”, अशीही प्रतिक्रिया सुशील कुलकर्णी यांनी दिली.
“याशिवाय ईडीची चौकशी सुरु आहे. काही नेत्यांना अटक होण्याची शक्यता आहे का? यात शिवसेना-राष्ट्रवादीचे कोण नेते येतील? कारण ईडीच्या फेऱ्यात या दोन पक्षांचेच नेते आहेत. त्यामुळे या दोन विषयांवरुन घडामोडी घडू शकतात. उद्या अनिल देशमुख यांची ईडी चौकशी होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरही घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. याशिवाय सचिन वाझे याने जे पत्र न्यायालयात सादर केलंय ते लीक झालं आहे. त्या पत्रात अनिल परबांचाही उल्लेख आहे. त्यामुळे ईडीचा फेरा अनिल देशमुखांमार्फत अनिल परबांपर्यंत पोहोचेल का? अनिल परबांपर्यंत पोहोचलं तर आणखी कुठपर्यंत पोहोचेल? कारण अनिल परब शेवटी कुणासाठी काम करतात हा देखील मुद्दा असेल”, असं मत सुशील कुलकर्णी यांनी मांडलं.
“सरकार अस्थिरतेबाबत चर्चा व्हावी, अशी उद्धव ठाकरे यांच्या मनात आहे. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा होत नाही, अशीही चर्चा आहे. याशिवाय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होत नाही, अशीही एक चर्चा आहे”, असं सुशील कुलकर्णी म्हणाले.
संबंधित बातम्या :
संजय राऊत आणि शरद पवार भेट व्हाया उद्धव ठाकरे! राजकीय विश्लेषकांच्या मते गाठीभेटीचं कारण काय?
मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल दीड तास चर्चा, पण 20 मिनिटात पवारांची भेट घेऊन संजय राऊत परतले