आदित्य ठाकरे सूचक, शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड
शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांचीही नावं चर्चेत होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे ते शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम राहतील.
मुंबई : शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी (Shivsena Legislative Assembly Leader) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. युवासेनाप्रमुख आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मांडलेल्या प्रस्तावाला शिवसेना आमदारांनी अनुमोदन दिलं. तर दिंडोशीचे आमदार सुनिल प्रभू हे शिवसेनेचे प्रतोद असतील. सेना भवनमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात पक्षाचे दिग्गज नेते आणि नवनिर्वाचित आमदार यांच्यात झालेल्या बैठकीनंतर यासंदर्भात घोषणा करण्यात आली.
शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदासाठी आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांचीही नावं चर्चेत होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने ते शिवसेनेच्या गटनेतेपदी कायम राहतील.
कोण आहेत एकनाथ शिंदे ?
-कडवट शिवसैनिक आणि मोठा जनाधार असणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख आहे -आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं -एकनाथ शिंदे ठाण्याच्या कोपरी- पाचपाखडी मतदारसंघाचे आमदार, तर ठाण्याचे पालकमंत्री आहेत -2004 पासून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. -विधानसभेपूर्वी ते ठाणे महापालिकेत 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून गेले -2014 मध्ये विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी -2014 मध्येच देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी -2018 मध्ये शिवसेना नेते म्हणून नियुक्ती -2019 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब निय़ोजन खात्याची अतिरिक्त जबाबदारी – विधानसभा निवडणुकीत 2014 मध्ये मोदी लाटेत ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला शिंदेंनी अबाधित ठेवला
फडणवीस सरकारमध्ये आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद मिळणार का, याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे. आदित्य ठाकरे यांची शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी (Shivsena Legislative Assembly Leader) निवड होणं, त्या दिशेने पहिलं पाऊल मानलं जात होतं.
उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, सुभाष देसाई यांच्यासह सर्व आमदार भगवे फेटे बांधून उपस्थित होते. मनोहर जोशी, नीलम गोऱ्हे, अनिल देसाई यासारखे नेतेही यावेळी हजर होते.
निलम गोऱ्हे यांनी आदित्य ठाकरे हे आमचे लाडके नेते असून पक्षाकडून एक गुड न्यूज येईल, असे संकेत ‘टीव्ही9 मराठीशी’ बोलताना दिले होते.
सत्तास्थापनेचा तिढा
विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत गाठता न आल्यामुळे सरकार स्थापन करण्यावरुन भाजप आणि शिवसेनेमध्ये तणातणी सुरु आहे. शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्याबाबत अर्थात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रही असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मात्र असं कुठलंच सूत्र ठरलं नसल्याचं सांगत सेनेला धक्का दिला.
ज्यांची बुद्धी भ्रष्ट त्यांचा विनाश, संजय राऊत यांचं मुनगंटीवारांना उत्तर
शिवसेना-भाजप यांच्यामध्ये अधिकृत-अनधिकृत बैठकांचं सत्र सुरु असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. यावेळी 16 मंत्रिपदांसह उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या एक-दोन दिवसात फडणवीस सरकारचा शपथविधी होण्याची चिन्हं आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची कालच भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाली, तर अजित पवार हे राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते म्हणून नियुक्त झाले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रिपदी, तर अजित पवार विरोधीपक्ष नेतेपदी निश्चित मानले जातात. त्यानंतर शिवसेनेच्या गटनेतेपदाबाबत (Shivsena Legislative Assembly Leader) उत्सुकता लागून राहिली होती.