‘त्या’ बाईवर 10 केसेस, तरीही उजळ माथ्यानं राज्यात फिरते’… शिवसेनेच्या मनिषा कायंदे आक्रमक
जातीचं खोटं सर्टिफिकेट, जन्माचा दाखल, एससी-बारावीचं सर्टिफिकेट खोटंच आहे, तरीही ही बाई फिरतेय...अशी टीका मनिषा कायंदे यांनी केली.
नवी मुंबईः त्या बाईवर (नवनीत राणा) 10 केसेस असूनही ती उजळ माथ्याने महाराष्ट्रभर फिरते. अटक वॉरंट असतानाही तिला कुणी काही बोलत नाही आणि प्रामाणिक शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल होतात, हे थांबलं पाहिजे, असा इशारा शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी दिला. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या घरावर मध्यरात्री झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरातील शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईत शिवसेनेचे (Shivsena)नेते एम के मढवी यांच्यावर तडीपारीची कारवाई झाल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी शिंदे आणि भाजप सरकारविरोधात आक्रमक भूमिका मांडली.
गेल्या 100 दिवसात मिंधे सरकार महाराष्ट्रात आहेत. जिथे जिथे शिवसैनिकांचे दौरे असतील तिथे सगळीकडे आपल्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकणं सुरु आहे, असा आरोप त्यांनी केला.
कुणाचा तरी इगो गोंजारण्यासाठी पोलिसांमार्फत हे सुरु आहे… आमचं शिवसेनाभवन तर त्यांचंही, आमची शाखा तर त्यांचीही शाखा… हे गव्हर्मेंट आहे की नक्कलसेना आहात? असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला.
नवनीत राणा यांच्यावर जवळपास 10 केसेस आहेत. ती बाई आज उजळ माथ्यानं महाराष्ट्रात फिरतेय. तिच्याविरोधात अरेस्ट वॉरंट निघालय, पण पोलीस तिला का अटक करत नाहीयेत, असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला.
जातीचं खोटं सर्टिफिकेट, जन्माचा दाखल, एससी-बारावीचं सर्टिफिकेट खोटंच आहे, तरीही ही बाई फिरतेय… पण प्रामाणिक शिवसैनिकांना पोलीस पकडतात, हे काय चाललंय महाराष्ट्रात? आज भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाला तर आम्ही तोंड उघडायचं नाही का, असा सवाल मनिषा कायंदे यांनी केला.
तुम्ही जेवढा आमचा आवाज दाबाल, आम्ही तेवढ्याच वेगाने बोलत राहू, रस्त्यावर लढा देऊ… तुमच्या नाकात दम आणू असा इशारा मनिषा कायंदे यांनी दिला.