चंद्रकांत खैरेंच्या आरोपांनंतर शिवसेनेची तातडीची बैठक
औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांनंतर आता औरंगाबादमध्ये युतीमध्ये ऑल इज वेल नसल्याचं समोर आलंय. चंद्रकांत खैरेंनी गैरसमजातून आरोप केले असल्याचं भाजपचे नेते प्रमोद राठोड यांनी म्हटलंय. तर चंद्रकांत खैरे त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्म न पाळता अपक्ष उभा असलेल्या जावयाला मदत केली, असा आरोप खैरेंनी केलाय. […]
औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या आरोपांनंतर आता औरंगाबादमध्ये युतीमध्ये ऑल इज वेल नसल्याचं समोर आलंय. चंद्रकांत खैरेंनी गैरसमजातून आरोप केले असल्याचं भाजपचे नेते प्रमोद राठोड यांनी म्हटलंय. तर चंद्रकांत खैरे त्यांच्या आरोपांवर ठाम आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युती धर्म न पाळता अपक्ष उभा असलेल्या जावयाला मदत केली, असा आरोप खैरेंनी केलाय.
औरंगाबादमध्ये युतीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर बहुजन वंचित आघाडीकडून इम्तियाज जलील, आघाडीकडून सुभाष झांबड आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचं आव्हान होतं. पण हर्षवर्धन जाधव यांना त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांच्याकडून मदत मिळाली असल्याचं खैरेंनी म्हटलंय. शिवाय तरीही आपण मोठ्या फरकाने जिंकून येऊ, असा दावाही त्यांनी केलाय.
या सर्व आरोप-प्रत्यारोपाच्या दरम्यानच शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची औरंगाबादमध्ये बैठक झाली. या बैठकीला चंद्रकांत खैरेही उपस्थित होते. पण या बैठकीत रावसाहेब दानवे यांच्याबाबत काहीच चर्चा झाली नसल्याची महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 7 तारखेला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुष्काळ दौरा होणार आहे. दौऱ्याचे नियोजन आम्ही बैठकीत केलं, अशी माहिती त्यांनी दिली.
खैरेंच्या आरोपांनंतर भाजपने प्रसिद्धी पत्रक जारी करुन प्रतिक्रिया दिली होती. औरंगाबादमधील स्थानिक नेत्यांनीही खैरेंचे आरोप फेटाळले आहेत. खैरेंनी गैरसमजातून आरोप केल्याचं भाजप नगरसेवक प्रमोद राठोड यांचं म्हणणं आहे. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसिद्ध करुन त्यांनी प्रतिक्रिया दिली.
खैरेंचे दानवेंवर आरोप
दानवेंनी जावयाला आवरलं नाही, असं खैरेंनी म्हटलंय. दानवेंविरुद्ध जालना लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पण उद्धव ठाकरे आणि खैरे यांनी खोतकर यांची समजूत काढली आणि खोतकरांनीही दानवेंचा प्रचार केला. ‘दानवेंनी प्रचाराच्या काळातच औरंगाबादच्या रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने पाच-सहा दिवस मुक्काम केला आणि राजकीय भेटीगाठी घेत जावयाला मदत केली. दानवेंना खुश करण्यासाठी औरंगाबादच्या भाजपच्या 8 ते 10 नगरसेवकांनीही आपल्याविरुद्ध हर्षवर्धन जाधव यांचं उघडपणे काम केलं. जाधव यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन आपल्याविरुद्ध प्रचार केला. दानवे आणि त्यांचे जावई जाधव यांना आवरा’ अशी तक्रार खैरे यांनी अमित शाह यांना भेटून केली. त्यावर शाह यांनी आपल्याला निश्चिंत राहण्याचे आश्वासन दिल्याचे खैरे यांनी सांगितलंय.