Ambadas Danve | हे तर गद्दार आणि कलंकित लोकांचं मंत्रिमंडळ.. आमदार अंबादास दानवेंनी नव्या मंत्र्यांवरील आरोपांचा पाढाच वाचला!
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापतींकडे दानवे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
औरंगाबादः हे सरकार गद्दार आणि दागी लोकांचं सरकार आहे, अशी घाणाघाती टीका शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या (CM Eknath Shinde) मंत्रिमंडळात कलंकित मंत्र्यांचा भरणा असल्याचा आरोप त्यांनी केला. चित्रा वाघ यांनी आरोप केलेले संजय राठोडच (Sanjay Rathod) आज मंत्री झाले. यापुढे भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात संघर्ष करणार असल्याचं दानवेंनी सांगितलं. औरंगाबादचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी हा इशारा दिलाय. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी दानवेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतींकडे दानवेंच्या नावाची शिफारसदेखील करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून दानवेंनी सरकारला धारेवर धरलं.
काय म्हणाले अंबादास दानवे?
शिवसेना आमदार अंबादास दानवे सरकारवर टीका करताना म्हणाले, हे सरकार गद्दारांचं तर आहेच. परंतु ज्यांच्या कपाळावर भ्रष्टाचाराचा डाग आहे, अशांचाही भरणा सरकारमध्ये आहे. गावित यांच्यावर कुणी कुणी काय काय आरोप केलेत, हे या मंत्रिमंडळात आहेत. संजय राठोडांवर भाजपच्या चित्रा वाघ यांनी कोण-कोणते आरोप केलेत हेही जनतेसमोर आहेत. अब्दुल सत्तार यांचंही नाव टीईटी घोटाळ्यात आलंय. बोगस प्रमाणपत्र देऊन त्यांच्याच नातेवाईकांना संस्थेत नोकरी देण्याचा प्रकार घडलाय. तानाजी सावंतांनी तर खेकड्यांमुळे अशी घटना घडल्याची असंवेदनशील भावना व्यक्त केली होती. अशा लोकांचा भरणा असलेलं हे सरकार गद्दारांचं आहे, आता त्यांच्याविरोधातआम्ही लढणार असल्याचं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.
दानवे लवकरच विरोधी पक्षनेते पदी
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी औरंगाबादचे शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या उपसभापतींकडे दानवे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. विधान परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेकडे हे पद येण्याची शक्यता वर्तवली जातेय. आज मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर उद्यापर्यंत दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी वर्णी लागेल, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
औरंगाबादचं राजकीय महत्त्व वाढणार
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादमधील तीन आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. शिंदे गटात गेलेले शिवसेना आमदार संदिपान भूमरे, अब्दुल सत्तार यांचा शपथविधी पार पडला तर भाजपचे आमदार अतुल सावे यांनादेखील मंत्रिपद देण्यात आले आहे. लवकरच या मंत्र्यांचे खातेवाटप होईल. त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांच्याकडे आल्याने औरंगाबाद हे मोठं राजकीय सत्ताकेंद्र बनेल, अशी शक्यता वर्तवली जातेय.