Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पक्षांतरानंतरही मैत्र कायम, अजितदादांच्या गाडीचं भास्कर जाधवांकडून सारथ्य

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी अजित पवार चिपळूणमध्ये आले असताना, भास्कर जाधवांनी त्यांना आपल्या घरी नेलं Bhaskar Jadhav Drives for Ajit Pawar

पक्षांतरानंतरही मैत्र कायम, अजितदादांच्या गाडीचं भास्कर जाधवांकडून सारथ्य
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 2:56 PM

रत्नागिरी : राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेत गेल्यानंतरही आमदार भास्कर जाधव यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मैत्र कायम दिसत आहेत. रत्नागिरीत अजित पवारांच्या गाडीचं सारथ्य करण्याची संधी भास्कर जाधवांनी सोडली नाही. (Bhaskar Jadhav Drives for Ajit Pawar)

राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यासाठी अजित पवार चिपळूणमध्ये आले होते. यावेळी भास्कर जाधव आपल्या जुन्या सहकाऱ्यांना घेऊन चिपळूणमधील निवासस्थानी गेले. अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री दत्ता भरणे हे जाधवांच्या घरी भोजनासाठी आले.

चिपळूणमधील हेलिपॅडपासून घरापर्यंत स्वतः भास्कर जाधव यांनी गाडी चालवली. भास्कर जाधवांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांचं थाटामाटात स्वागत करण्यात आलं.जाधवांच्या सारथ्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आलं आहे.

विनायक राऊतांचा हात झटकला

याआधी, भास्कर जाधवांची शिवसेनेवरील नाराजी दोनवेळा दिसून आली होती. गणपतीपुळ्यातील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारीला करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या सत्कारानंतर फोटो काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वांना सोबत येण्याची विनंती केली. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांना दोन-तीन वेळा आवाज दिला. मात्र जाधवांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा : भास्कर जाधवांची नाराजी पार्ट टू

विनायक राऊत स्वत: भास्कर जाधव यांना बोलवण्यासाठी शेजारी गेले. त्यांनी जाधवांना सगळ्यांसोबत येण्याची विनंती केली. मात्र तेव्हाही त्यांनी हात झटकत नकार दर्शवला. तसेच त्यांना या कार्यक्रमासाठी नारळ वाढवण्याची विनंती करण्यास सांगितल्यावरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. (Bhaskar Jadhav Drives for Ajit Pawar)

उदय सामंतांना चितपट

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कोकणात स्वतंत्र विद्यापीठासाठी कमिटी नेमल्याचं जाहीर केलं. मात्र, यावर भास्कर जाधव यांनी थेट विधिमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित करुन सामंत यांना चितपट केलं. जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सावंत यांच्यावर अशी कोणतीही समिती स्थापन केली नसल्याचं स्पष्टीकरण देण्याची नामुष्की आली होती.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी केली होती. गुहागर विधानसभा मतदारसंघातून ते निवडूनही आले. मात्र मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील थिएटर बंद ठेवण्याचे आदेश देऊनही मुंबईत काही ठिकाणी थिएटर सुरु ठेवण्यात आले आहेत. जर कोणी आदेश देऊनही जुमानत नसतील, तर राज्य सरकार कारवाई करेल, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.

कोरोना हे देशावर आलेले संकट आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचं अधिवेशन संपवत आहोत. कोरोनाबाबत घाबरुन जाऊ नका. गर्दीचे प्रसंग टाळा, गर्दीपासून लांब राहा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे. शाळा आणि महाविद्यालयांबाबत राज्य सरकार विचार करुन लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. (Bhaskar Jadhav Drives for Ajit Pawar)

आणखी बातम्या वाचा :