अंधेरीत मनसे भाजपसोबत गेली तर? ठाकरे गटातील नेत्याची प्रतिक्रिया काय?
आम्ही 25 हजार मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय. मात्र या दाव्यात फार तथ्य नसल्याचं रविंद्र वायकर म्हणाले.
गिरीश गायकवाड, मुंबईः अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत (Andheri East By Poll) मनसे भाजपसोबत गेली तर ठाकरे गटातील (Thackeray fraction) उमेदवाराला फटका बसेल का अशी भीती व्यक्त केली जातेय. यावर शिवसेना आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waykar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसेच्या मतांची टक्केवारी पाहता त्यांची आम्हाला भीती नसल्याचं वायकर म्हणाले. अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे.
तर भाजपच्या वतीने मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिंदे गट आणि भाजपच्या महायुतीमुळे अंधेरीची ही निवडणूक शिवसेनेसाठी तगडं आव्हान ठरेल, असं म्हटलं जातंय.
या निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये. यावर विचारलं असता रविंद्र वायकर म्हणाले, अंधेरी हा आधी काँग्रेसचा गड होता. त्यानंतर शिवसेना प्रबळ झाली. आता 31% टक्के शिवसेनेची त्यानंतर 28% ही काँग्रेसची मतं आहेत. त्यानंतर 25% भाजपाची मतं आहेत. त्यानंतर राहिलेली थोडी मनसे वगैरे आहे. त्यामुळे 65% मतं वेगळी पडणार आहे. म्हणून विजय हा निश्चितच आमचा होणार आहे…
आम्ही 25 हजार मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय. मात्र या दाव्यात फार तथ्य नसल्याचं रविंद्र वायकर म्हणाले. ऋतुजा लटकेंना जेवढ्या अडचणी निर्माण करायच्या होत्या, तेवढ्या अडचणी आणल्या. एक महिन्याचा पगार भरल्यानंतर तत्काळ अर्ज मंजूर करायला हवा होता, मात्र तोही अडवला, असा आरोप वायकर यांनी केला.