मुंबईः महाराष्ट्र शिवसेनेतून बंडखोरी करून बाहेर पडलेल्या शिवसेना आमदारांनी आपली सुरक्षा काढून घेतल्याची तक्रार केली आहे. महाराष्ट्र सरकारने आपली आणि आपल्या कुटुंबियांचं संरक्षण कवच कमी केल्याने आमच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 37 आमदारांच्या स्वाक्षरीने यासंदर्भातील राज्य सरकारला लिहिलेलं एक पत्र ट्विट केलंय. यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) पहिलीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले आमदारांना महाराष्ट्रात सुरक्षा (MLA Security) दिली जाते. ते राज्याच्या बाहेर असतील तर तिथे सुरुक्षा नसते. आणि सरकारतर्फे केवळ आमदारांना सुरक्षा दिली जाते. त्यांच्या कुंटुबियांची जबाबदारी राज्य सरकारची नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, ‘ घरच्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली. ते महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांनी पलायन केलं आहे. त्यांची सुरक्षा आमदार म्हणून. कुटुंबाला सुरक्षा नसते. महाराष्ट्रात या.. आपल्या राज्यात या..असं भिकाऱ्यासारखं का वणवण भटकतायत. असं करू नका. स्वतःला वाघ मानताय.. मग बकरीसासरखं बें बें करू नका. हे सोडून द्या. अजूनही संधी गेली नाही… असं संजय राऊत म्हणाले.
राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे.#MVAisAntiShivsena pic.twitter.com/lX2qjVTxGM
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 25, 2022
सध्या गुवाहटीत असलेले बंडखोर शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी आज सकाळीच एक ट्विट केलंय. त्यात ते म्हणालेत, राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदरांचं संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे…. असं म्हणत शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, तसेच सर्व पोलीस आयुक्तांच्या नावे पाठवले आहे. यात 37 आमदारांच्या सह्यांचंही पत्र पाठवलं आहे.
हजारो शिवसैनिक आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला अजूनही कोणताही धोका नाही, हे सांगताना संजय राऊत म्हणाले, ‘ वर्तमान आणि भविष्यााबाबत अनेक निर्णय घेतले जातात. पैसे आहेत म्हणून महाशक्ती कुणाच्या पाठीशी आहे. म्हणून अशा पद्धतीनं हायजॅक करता येणार नाही. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे. हजारो शिवसैनिक माझ्या मागे आहेत… म्हणून मी शिवसेना प्रमुख. आजही उद्धव ठाकरेंच्या पाठिशी हजारो शिवसैनिक आहेत. कुणालाही पैसे, दहशत आणि अफवांच्या बळावर कुणालाही नेता येणार नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक जमतील. सांगली-साताऱ्यातूनही लोक संपर्कात आहेत. फक्त आदेशाची वाट पाहतील. आजच्या कार्यकारिणीत महत्त्वाचे ठराव मंजूर होतील.’