राज्यात आघाडी दापोलीत सेना-राष्ट्रवादी वाद विकोपाला, योगेश कदम यांच्याकडून NCP नेत्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव
महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष दिसून आलेला आहे.
रत्नागिरी: महाराष्ट्रात 2019 मध्ये शिवसेना, (Shivsena) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस यांनी मित्रपक्षांना सोबत घेत महाविकास आघाडीच्यावतीनं सत्ता स्थापन केली आहे. भिन्न विचारधारेचे पक्ष असल्यानं हे सरकार कधीही कोसळेल अशा प्रकारची वक्तव्य विरोधी पक्षाकडून करण्यात येत होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला आहे. दोन वर्षांच्या काळात काही ठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात संघर्ष दिसून आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मतदारसंघात देखील शिवसेना आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या दापोली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झालेली पाहायला मिळाली. दापोलीचे शिवसेना आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. संजय कदम यांना अधिकार नसताना ते भूमिपूजन कार्यक्रम करत असल्याचा आरोप योगेश कदम यांनी केलाय.
उपसभापतींकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार संजय कदम यांचे विधानसभा उपसभापती यांचेकडे हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. अधिकार नसतानाही माजी आमदार संजय कदम विकास कामाचे भूमिपूजन करीत असल्याचा आरोप आमदार योगेश कदम यांनी केलाय. राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरीही दापोलीत मात्र , सेना -राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद विकोपाला गेला आहे .
हक्कभंग दाखल करण्याचं नेमकं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यामागील कारण योगेश कदम यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. माजी आमदार संजय कदम यांना भूमिपूजन करण्याचा अधिकार नसताना देखील ते भूमिपूजन करत आहेत. त्यामुळं हक्कभंग प्रस्ताव दाखल केल्याचं योगेश कदम यांनी सांगितलं आहे.
दापोली नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये राज्याचं लक्ष दापोली या नगरपंचायतीकडे लागलं होतं. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या युतीनं निवडणूक लढवली होती. तर, शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं.
इतर बातम्या :
Masik Durga Ashtami February 2022 : आज माघ दुर्गाष्टमी, जाणून घ्या तिचे महत्व आणि तिथी