मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात राजकीय घडामोडी या कायमच चर्चेचा विषय असतात. सहकारी संस्थांची सूत्रे हातात ठेवण्यासाठी आणि प्रादेशिक वर्चस्वासाठी खेळले जाणारे गटातटाचे राजकारण, हा तर कोल्हापुरातील संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. याच राजकारणातून कोल्हापुरात अनेक मातब्बर राजकीय घराणी निर्माण झाली आहे. या राजकीय घराण्यांमध्ये सुरु असलेल्या राजकीय लढाईमध्ये पारडे कधी या तर कधी त्या बाजूला झुकते. मात्र, या साऱ्या राजकीय पटाची एकूण मांडणी अत्यंत रंजक आहे. यापैकीच एक घराणे म्हणजे मंडलिक घराणे.
कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक सध्या या घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना पराभवाची धूळ चारत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला पहिलावहिला विजय मिळवून दिला होता. या मतदारसंघातील लढतीसाठी वापरण्यात गेलेली ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन त्यावेळी महाराष्ट्रात प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती.
सदाशिवराव मंडलिक आणि विजयमाला मंडलिक या दाम्पत्याच्या पोटी 13 एप्रिल 1964 रोजी कोल्हापुरात संजय मंडलिक यांचा जन्म झाला. संजय मंडलिक यांनी राज्यशास्त्रात एम.ए. केले आहे. त्यानंतर संजय मंडलिक यांनी शिवाजी विद्यापीठातूनच बी.एड चे शिक्षण पूर्ण केले. वडील सदाशिवराव मंडलिक यांच्या छत्रछायेखाली त्यांनी सहकार क्षेत्रातील राजकारणात पाऊस ठेवले. संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर काही काळ त्यांनी अपक्ष म्हणून काम केले. या काळातही त्यांनी काँग्रेसच्या साथीने आणि वैयक्तिक करिष्म्यावर खासदारकी कायम राखण्यात यश मिळवले.
संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक चारवेळा खासदार राहिले होते. त्यामुळे साहजिकच कोल्हापूर घराण्यात मंडलिक घराण्याचा प्रचंड दबदबा होता. परिणामी संजय मंडलिक यांच्यासाठी राजकीय प्रवेश हा अगदीच सोपा होता. त्यांनी जिल्हा परिषदात सहकार क्षेत्रातून राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला. 1998 साली ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष झाले. 2003 मध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा सरकारी बोर्डाचे अध्यक्ष झाले.
एकीकडे सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापुरच्या राजकारणात आपला दबदबा कायम ठेवत असताना संजय मंडलिक स्वतंत्रपणे आपल्या राजकीय कारकीर्दीला आकार देत होते. 2012 मध्ये संजय मंडलिक कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. 2014 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रावादीच्या वाट्याला आला. हा मतदारसंघ काँग्रेसने मागून घ्यावा, यासाठी मंडलिक पितापुत्रांनी दिल्लीत तळ ठोकून अनेक प्रयत्न केले. मात्र, यामध्ये त्यांना अपयश आले.
त्यामुळे राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यासाठी 2014 मध्ये संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांना मोदी लाट असूनही राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांच्याकडून 33,259 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. अखेर 2019 च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांना 2,70,568 अशा दणदणीत मताधिक्याने मात देत जुन्या पराभवाचा वचपा काढला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील 2019 सालची निवडणूक महाराष्ट्रात बराच चर्चेचा विषय ठरली होती. या निवडणुकीत काँग्रसेच्या सतेज पाटील यांनी महाडिक गटाशी असलेल्या वैरामुळे आघाडी असूनही स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात उघड उघड बंड पुकारले होते. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा हा शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना मिळाला. त्यावेळी सतेज पाटील गटाकडून वापरण्यात आलेली ‘आमचं ठरलंय’ ही टॅगलाईन प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. संजय मंडलिक यांच्या विजयानंतर “आमचं ठरलं तेच करून दाखवलं आणि तसंच घडलं’ ही टॅगलाईनही लोकप्रिय झाली होती.
2019 मध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात महापूर आला होता. या काळात खासदार संजय मंडलिक यांच्या संकल्पनेतून ‘खासदार किचन’ संकल्पना राबवण्यात आली. या माध्यमातून त्या काळात दररोज 2500 लोकांना नाश्ता आणि जेवण पुरवण्यात आले होते. तसेच सदाशिवराव मंडलिक ट्रस्टच्या माध्यमातून विविध ठिकाणी विस्थापितांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती.