मुंबई: संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली. (MNS leader Sandeep Deshpande slams Shivsena MP Sanjay Raut)
ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौऱ्यावर खोचक टिप्पणी करणाऱ्या शिवसेनेचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, असे देशपांडे यांनी म्हटले.
या पत्रकारपरिषदेत संदीप देशपांडे यांनी महाविकासघाडीच्या नेत्यांनाही टोला हाणला. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी काहीही केले तरी ते माफ असते. त्याशिवाय आणखी कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.
तौक्ते चक्रीवादळामुळे गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रात नुकसान झाले आहे. अशा संकटाच्यावेळी कोणावरही टीका करणे योग्य नाही. मात्र, गुजरात हे पंतप्रधान मोदी यांचे स्वत:चे राज्य आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे फक्त गुजरातचा दौरा करत असावेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहेत, याचीही त्यांना खात्री पटली असावी. महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर आहे. त्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संबंधित बातम्या:
Cyclone Tauktae: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात, दीवमध्ये; वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; राष्ट्रवादीचा सवाल
(MNS leader Sandeep Deshpande slams Shivsena MP Sanjay Raut)