“जीवनात ‘त्या’ व्यक्तीला नेहमी सांभाळून ठेवा”, संजय राऊतांच्या फेसबुक पोस्टमध्ये नाराजीचा सूर
संजय राऊत यांच्या शुभेच्छा देण्याच्या अंदाजाने एकदा पुन्हा त्यांच्या मनातील नाराजी उघड केली आहे. भावाला मंत्रिमंडळातून डावलल्याने ते नाराज असल्याचं त्यांच्या पोस्टमधून दिसून येत असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार तर झाला (Cabinet Expansion). मात्र, या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे. कारण, सध्या उद्धव ठाकरे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांच्या नाराजीला सामोरे जावं लागत आहे. आमदारच नाही तर शिवसेनेचे खासदार आणि पक्षाचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे संपादक संजय राऊत हे देखील उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याची चर्चा आहे. संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे भाऊ आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा आहे.
संजय राऊतांची ही नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे. नववर्षाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी फेसबुकवर त्यांच्या विशेष अंदाजात नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांच्या या फेसबुक पोस्टमध्ये ते नाराज असल्याचं जाणवलं.
संजय राऊत यांनी बुधवारी (1 जानेवारी) ला फेसबुक पोस्ट करत एक फोटो शेअर केला. या फोटोवर ‘नेहमी त्या व्यक्तीला सांभाळून ठेवा ज्यांनी तुम्हाला या तीन भेट दिल्या, सोबत, वेळ आणि समर्पण’.
याआधी त्यांनी मंगळवारी (31 डिसेंबर) रात्री एक ट्वीट करत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
संजय राऊत यांच्या शुभेच्छा देण्याच्या अंदाजाने एकदा पुन्हा त्यांच्या मनातील नाराजी उघड केली आहे. भावाला मंत्रिमंडळातून डावलल्याने ते नाराज असल्याचं त्यांच्या पोस्टमधून दिसून येत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, संजय राऊतांनी पक्षावर नाराजीच्या बातम्या फेटाळल्या आहेत. ‘माझं कुटुंब ठाकरे कुटुंबासोबत नेहमी राहिल. पक्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे कमी पर्याय होते’, असं संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षावर नाराज असण्याच्या बातम्या फेटाळताना म्हटलं. तरीही ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात अद्यापही सुरु आहेत.
संजय राऊत यांनी ते पक्षावर नाराज नसल्याचं सांगितलं असलं, तरी ते मंत्रिमंडळ विस्तारात गैरहजर असल्याने या चर्चांना उधाण आलं. मात्र, मी कुठल्याही शासकीय कार्यक्रमांमध्ये जात नाही, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. मात्र, आता संजय राऊत यांच्या या पोस्टमुळे ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे.
Shivsena MP Sanjay Raut Facebook post