अर्णव गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून, राज्य सरकारचा संबंध नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट

| Updated on: Nov 04, 2020 | 10:18 AM

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई पोलिस कुणावरही अन्याय करत नाहीत. राज्यात कायद्याचंच राज्य असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

अर्णव गोस्वामीवरील कारवाई पोलिसांकडून, राज्य सरकारचा संबंध नाही, संजय राऊतांकडून स्पष्ट
Follow us on

मुंबई: ‘महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. इथं सर्वकाही कायद्यानुसार चालतं. अर्णव गोस्वामी यांच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी काहीही संबंध नाही’, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूड उगवत नाहीत, अशी प्रतिक्रियाही राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. (Shivsena MP Sanjay Raut on Arnav Goswami arrest)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असंही संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.

पत्रकारितेसाठी काळा दिवस नाही- राऊत

अर्णव गोस्वामी यांना अटक म्हणजे पत्रकारितेसाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया अनेक स्तरातून उमटत आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी पत्रकारितेसाठी हा काळा दिवस नसल्याचं म्हटलं आहे. राज्यात पत्रकार आणि पत्रकारिता अशा कुणालाही धोका नाही. आम्हीही पत्रकार आहोत. चुकीचं काही केलं नसेल तर जोरजोरात ओरडण्याची गरज लागत नाही, असा टोला राऊत यांनी गोस्वामींना लगावला आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं एका सुनावणीदरम्यान संबंधित चॅनेलवर टिप्पणी केली होती. त्या दिवसालाही काळा दिवस म्हणणार का? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे. पत्रकाराने आपल्या मर्यादा पाळायला हव्या, असा सल्लाही यावेळी संजय राऊत यांनी दिला आहे.

काय आहे अर्णव गोस्वामी अटक प्रकरण?

मुंबईतील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले होते. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाउसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करत होती. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते. तर दुसरीकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या:

Arnab Goswami Arrest : सोनिया सेना आणखी किती गळे दाबणार? कंगनाचा शिवसेनेवर हल्लाबोल

अर्णव गोस्वामींच्या अटकेवर केंद्राची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्र सरकारची कारवाई आणीबाणीसारखी: प्रकाश जावडेकर

पोलिसांचा दुरुपयोग करत महाराष्ट्र सरकारकडून राज्यात अघोषित आणीबाणी, भाजपचा गंभीर आरोप

Shivsena MP Sanjay Raut on Arnav Goswami arrest