मुंबई: मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवणारे श्रीरंग उर्फ आप्पा बारणे हे राज्यातील प्रमुख खासदारांपैकी एक आहेत. 2019 च्या निवडणुकीत तर श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी शरद पवारांचा नातू असलेल्या पार्थ पवार यांना धूळ चारली होती. या निवडणुकीत अजित पवार यांनी आपल्या मुलाच्या विजयासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र, मी कोणत्या पार्थ पवारला ओळखत नाही, कोणताही पवार आला तरी मावळमध्ये मीच जिंकणार, अशी गर्जना श्रीरंग बारणे यांनी केली होती. पार्थ पवार यांना पराभवाची धूळ चारत त्यांनी हा शब्द खराही करुन दाखवला होता. (Shivsena MP Shrirang Barne political journey)
श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1964 रोजी झाला. नववीपर्यंत शिक्षण झालेले श्रीरंग बारणे पुढे जाऊन शेती आणि बांधकाम व्यवसायात उतरले. पिंपरी-चिंचवड शहर हा श्रीरंग बारणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथूनच 1997 साली श्रीरंग बारणे यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ केला. 1997 ते 2012 या काळात श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदे भुषविली. 2014 साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळचे तत्कालीन खासदार गजानन बाबर यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत बारणे यांनी राष्ट्रवादी आणि शेकापच्या उमेदवाराला धूळ चारत विजय मिळवला. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला.
श्रीरंग बारणे आपल्या खासदारकीच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात संसदेच्या कामकाजात स्वत:ची विशेष छाप पाडली आहे. 2015, 2016, 2018 आणि 2019 या काळात श्रीरंग बारणे हे संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संसदपटूंपैकी एक होते. 2020 साली त्यांना संसद महारत्न या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
श्रीरंग बारणे यांनी 2019 च्या निवडणुकीवेळी आपली संपत्ती जाहीर केली. त्यावेळी अनेकांचे डोळे विस्फारले होते. श्रीरंग बारणे यांच्या एकट्याकडे तब्बल 65 कोटींची मालमत्ता आहे. याशिवाय, त्यांच्या पत्नीच्या नावावरही लाखोंची मालमत्ता आहे. याशिवाय, श्रीरंग बारणे यांच्याकडे मर्सिडीज बेन्झ आणि टोयोटा फॉर्च्युनर या महागड्या गाड्या असल्याची माहिती त्यांनी दिली होती.
गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांनी उमेदवारी जाहीर केली. अजित पवार यांचे पुत्र मावळ लोकसभा मतदारसंघात उतरणार म्हणल्यावर मावळमधील बहुतांश दिगग्ज उमेदवारांनी आपली तलवार आधीच म्यान केली. अजित पवार यांच्याशी सरळसरळ वैर पत्कारण्यास कोणीही तयार नव्हते.
मात्र, श्रीरंग बारणे समोर खंदा प्रतिस्पर्धी उभा असूनही डगमगले नाहीत. कोण पार्थ पवार? मी ओळखत नाही. अजित पवारांचा मुलगा आहे. पार्थ पवार आला किंवा दुसरा कोणता पवार आला, याची मला चिंता नाही. 2019 ला म्हणजे पुढचा खासदार मीच असेन, असे श्रीरंग बारणे यांनी ठामपणे सांगितले होते. हा शब्द त्यांनी पुढे खराही करून दाखवला.
(Shivsena MP Shrirang Barne political journey)