सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील (Shivsena) वैर काही केल्या थांबताना दिसत नाही. राणे पिता-पुत्र आणि शिवसेनेतील नेत्यांची आरोप-प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणीची मालिका सुरुच आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना डिवचलं आहे. लोकसभेत राणेंना विचारण्यात आलेल्या एका इंग्रजी प्रश्नावरुन विनायक राऊत यांनी राणेंना जोरदार टोला लगावला आहे.
लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता. कनीमोझी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची ही पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पध्दतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. लोकसभेत मलासुध्दा राणेंना प्रश्न विचारता आला असता, पण ते आपलेच गाववाले आहेत. आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, अशा शब्दात राऊत यांनी राणेंना खोचक टोला लगावला आहे.
विनायक राऊत यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलंय. जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू आणि सुज्ञ नेते आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत या विचाराचे ते आहेत. मात्र, कुठे काही वैचारिक मतभेद किंवा गॅपिंग असेल तर ती नक्कीच दूर केली जाईल. परंतू कोणत्याही परिस्थितीत मोठ्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असं सर्वांचं मत आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे स्वतंत्र आहेत. त्यांना कुणी बंधन केलेलं नाही. मात्र, प्रत्येकजण परिस्थितीनुसार युती, महायुती करतील आणि भविष्यातील निवडणुका लढवतील. कुणावरही बंधन नाहीत, असं राऊत म्हणाले.
सत्ता स्थापन झाली म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडीत आलंच पाहिजे असं बंधन नाही. मात्र, एक संकेत आहे आणि सर्वांना वाटतं महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका झाल्या तर चांगलं आहे. मात्र, भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर किती आहे ते मी पाहिलेलं नाही, असं म्हणत राऊतांनी आव्हाडांनाही टोला लगावलाय.
इतर बातम्या :