दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट, मोदींनाही बैल म्हणतात, मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; राऊत बरसले
Vinayak Raut | भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याचा 'सांड' असा उल्लेख करणे दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे.
रत्नागिरी: केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बैल म्हटले, हा पंतप्रधानपदाचा अपमान आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले. विनायक राऊत यांनी रविवारी रत्नागिरी येथे ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. य़ावेळी विनायक राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे. या मस्तीमध्ये भाजपच्या नेत्यांची विकृती दिसून येते. राजकीय नेत्याचा ‘सांड’ असा उल्लेख करणे दानवे गुरुजींची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं लक्षण आहे. याची दखल नरेंद्र मोदी यांनी घ्यावी. मोदी यांना बैल म्हणणे म्हणजे त्यांचा अवमान करण्यासारखा आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही विनायक राऊत यांनी केली.
बाडगा असतो तो कोडगा असतो; विनायक राऊतांची राणेंवर शेलक्या भाषेत टीका
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. बाडगा असतो तो कोडगा असतो. शिवसेनेवर टीका करण्यासाठीच भाजपने बुजगावणे पुढे केले आहे, असा घणाघाती हल्ला विनायक राऊत यांनी चढवला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत. त्यांना भाजपमध्ये घेऊ असं नारायण राणे म्हणाले होते. राणेंच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी हा हल्ला चढवला आहे. बाडगा जो असतो तो कोडगा असतो. भाजपने शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंचे बुजगावणे पुढे केलं आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यास सांगितलं. परंतु, पंतप्रधानाच्या या आवाहनाला राणेंनी हरताळ फासला. जन आशीर्वाद यात्रेतून राणेंनी लोकांचे किती प्रश्न समजवून घेतले?, असा सवाल राऊत यांनी केला.
राणे तिसरी लाट आणणार
राणेंची जन आशीर्वाद यात्रा सोमवारी रत्नागिरीत दाखल होत आहे. यावेळी राणे शक्ती प्रदर्शन करतील. त्याचाही राऊतांनी समाचार घेतला. ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत. कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.
संबंधित बातम्या:
Video : दानवे काय बोलतील नेम नाही? राहुल गांधींना ‘सांड’ म्हणता म्हणता ते काय काय बोलून गेले ऐका