मातोश्रीवर अंतिम फैसला!! नाशिक पदवीधर निवडणूक; ठाकरे गटाचा शुभांगी पाटलांना पाठिंबा!

| Updated on: Jan 14, 2023 | 3:12 PM

अखेर महाविकास आघाडीतर्फे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

मातोश्रीवर अंतिम फैसला!! नाशिक पदवीधर निवडणूक; ठाकरे गटाचा शुभांगी पाटलांना पाठिंबा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, मुंबईः नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मूळ उमेदवार ऐनवेळी पलटल्याने मोठी राजकीय गुंतागुंत झाली. काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी ऐनवेळी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडी कुणाला पाठिंबा देणार, यावरून आज सकाळपासून राजकीय खलबतं सुरू होती. नाशिक शिवसेनेचे पदाधिकारी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे तसेच इतर नेत्यांमध्ये आज सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरु होतं. आज अखेर ठाकरे गट अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना पाठिंबा देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

शुभांगी पाटलांना महाविकास आघाडीचा पाठिंबा?

उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज सकाळपासून मातोश्रीवर बैठक सुरु होती. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यादेखील आज मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या. त्यामुळे शिवसेना शुभांगी पाटील यांनाच पाठिंबा देणार, असं म्हटलं जात होतं.

मात्र महाविकास आघाडी शिवसेना समर्थित उमेदवाराला पाठिंबा देणार की नाही? की निवडणुकांवरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल, याकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र सध्या तरी नाशिकची जागा ठाकरे गट लढवणार असून शुभांगी पाटील यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची घोषणाही लवकरच होण्याची शक्यता आहे.

शुभांगी पाटील कोण आहेत?

शुभांगी पाटील या धुळे येथील भास्कराचार्य संशोधन संस्थेत त्या शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या संस्थापक आणि राज्याच्या अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापकदेखील आहेत. जळगावमधील गोपाळ बहुउद्देशीय संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत.

सत्यजित तांबेंविरोधात सामना

नाशिक पदवीधर मतदार संघात शुभांगी पाटील यांचा सत्यजित तांबे यांच्याविरोधात सामना रंगणार आहे. सत्यजित तांबे यांना भाजपाचा पाठिंबा मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या वतीने अद्याप स्पष्ट वक्तव्य आलेलं नसलं तरीही फडणवीस यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे सत्यजित तांबे हे भाजप समर्थित उमेदवार असतील हे निश्चित आहे.
तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्या पाठीशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष उभे असल्याचं चित्र आहे.