उन्मादाचा शेवटी ‘उदयनराजे’ होतो, ‘सामना’तून शिवसेनेचे खडे बोल
2014 मध्ये भाजपचा वारु उद्धव ठाकरे यांनी रोखला होता, आता 2019 मध्ये तो शरद पवार यांनी रोखला, असं म्हणत शिवसेनेने पवारांचं कौतुक केलं आहे
मुंबई : महाराष्ट्रातील जनतेला गृहीत धरु नका, महाराष्ट्राचा निकाल हेच सांगतोय, अशा शब्दात ‘सामना’च्या रोखठोक सदरातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. उन्मादाचा शेवटी ‘उदयनराजे’ होतो, अशा कानपिचक्याही सेनेने (Shivsena on Udayanraje Bhosale) लगावल्या आहेत.
2014 मध्ये भाजपचा वारु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रोखला होता, आता 2019 मध्ये तो राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखला आहे. विरोधकांचे 20-25 आमदारही येणार नाहीत, असं माध्यमात चित्र उभ करणाऱ्यांनी 100 पारचा टप्पा गाठला. सगळ्याचं श्रेय फक्त शरद पवारांना जातं, असं म्हणत शिवसेनेने पवारांचं कौतुक केलं आहे.
शिवसेनेच्या आज जरी 56 जागा असल्या, तरी रिमोट कंट्रोल मात्र उद्धव ठाकरे यांच्याच हाती आहे. काँग्रेस राष्ट्रवादीतले वतनदार विकत घेऊन, चौकशांचा धाक दाखवून आयारामांचा जो बाजार भरवला होता तो शेअर बाजारासारखा कोसळला, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपने लेखी आश्वासन द्यावं, शिवसेनेची मागणी
उदयनराजेंना उडवायला कॉलरही शिल्लक ठेवली नाही, इतका त्यांचा दारुण पराभव केला. मुख्यमंत्री कोण, सरकार कसे आणि कोणाचे यावर चर्चा बंद, फटाके मात्र दिवाळीनंतर फुटतील. 106 जागा जिंकूनही भाजपच्या डोक्यावर टांगती तलवार आणि फडणवीसांच्या चेहऱ्यावर तणाव आहे, असंही शिवसेनेने म्हटलं आहे.
उन्मादाचा शेवटी उदयनराजे होतो आणि मग प्रजा जुमानत नाही (Shivsena on Udayanraje Bhosale). शिवसेना फरफटत येईल, हे स्वप्नही साकार झाले नाही. महाराष्ट्राचे गृहीतक वेगळं आहे. गृहीत धरु नका हाच कालच्या निकालाचा अर्थ, पुढच पुढे पाहू, असं शिवसेनेने ‘सामना’तून स्पष्ट केलं आहे.