भाजपचा सत्तास्थापनेस नकार, शिवसेना समीकरण कसं जुळवणार?

| Updated on: Nov 10, 2019 | 6:59 PM

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत केवळ 56 जागा जिंकल्या होत्या. अपक्ष आमदारांनी दिलेल्या पाठिंब्यासह शिवसेनेचं संख्याबळ 64 वर पोहचलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 चा आकडा गाठणं आवश्यक आहे

भाजपचा सत्तास्थापनेस नकार, शिवसेना समीकरण कसं जुळवणार?
Follow us on

मुंबई : सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी दिलेलं निमंत्रण भाजपने नाकारलं आहे. भाजपच्या कोअर कमिटीने राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपला निरोप कळवला. शिवसेनेची सोबत येण्याची इच्छा नसल्याचं सांगत भाजपने असमर्थता दर्शवली. त्यामुळे आता शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा (Shivsena Options for Government Formation) करायचा झाल्यास त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय उपलब्ध असतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत यांच्या महायुतीला जनतेने भरघोस जनादेश दिला. त्यामुळे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिलं. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो, जनादेश देखील महायुतीला दिला. मात्र, शिवसेनेची सोबत येण्याची इच्छा नसल्यामुळे आम्ही राज्यपालांना सत्तास्थापन करु शकत नसल्याचं कळवलं, असं चंद्रकांत पाटील यांनी भाजप कोअर कमिटीच्या वतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.

शिवसेनेने जनादेशाचा अनादर करत सोबत येण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायचं असल्यास आमच्या खूप खूप शुभेच्छा, असा तिरकस निशाणा साधत चंद्रकांत पाटील निघून गेले. त्यामुळे आता राज्यपाल शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी विचारणा करणार का आणि त्यानंतर शिवसेना सत्तास्थापन करणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

सत्तास्थापनेस भाजपचा नकार, कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय

‘अडीच’साठी अडलेले अडचणीत

शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत केवळ 56 जागा जिंकल्या होत्या. अपक्ष आमदारांनी दिलेल्या पाठिंब्यासह शिवसेनेचं संख्याबळ 64 वर पोहचलं. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 145 चा आकडा गाठणं आवश्यक आहे. त्यामुळे आणखी 81 आमदारांची जुळवाजुळव शिवसेनेला करावी लागणार आहे. अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेली शिवसेना अडचणीत आल्याचं बोललं जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिल्यास… (Shivsena Options for Government Formation)

पर्याय 1

शिवसेना- अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + काँग्रेस (44) + राष्ट्रवादी (54) = 162
बविआ (3) + समाजवादी पक्ष (02) + स्वाभिमानी (01) = 162+06 = 168
बहुमताचे संख्याबळ – 145

पर्याय 2

राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आणि काँग्रेस तटस्थ राहिली तर
सभागृहाचे संख्याबळ 288 वजा 44 = 244
शिवसेना – अपक्षांच्या पाठिंब्यासह (64) + राष्ट्रवादी (54)+ काँग्रेस समर्थक अपक्ष (04)  =  122
बहुमताचे संख्याबळ – 123

काँग्रेस-राष्ट्रवादीने अद्याप आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. आपल्याला जनादेश नसल्याचं सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शवली आहे. काँग्रेस आमदारांनी सेनेला पाठिंबा देण्यास सकारात्मकता दर्शवली असली, तरी अंतिम निर्णय हा हायकमांड सोनिया गांधी यांचा असेल. भाजपला सत्तेपासून दूर राखण्यासाठी सेनेला पाठिंबा देण्याची खेळी काँग्रेस-राष्ट्रवादी खेळू शकते, अशी चर्चा आहे.

भाजपने कोअर कमिटीची बैठक घेऊन सत्तास्थापनेच्या सर्व शक्यतांची चाचपणी केली. या बैठकीत भाजपमध्ये दोन मतप्रवाह पाहायला मिळाले. यातील एक गट अल्पमतातील सरकार स्थापनेचा आग्रह करत होता, तर दुसरा गट असं अल्पमताचं सरकार स्थापन करणं धोक्याचं असल्याचं म्हणत विरोध करत होता. त्यामुळे ही बैठक बरीच लांबली. स्वत: अमित शाह यांनीही महाराष्ट्रातील नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

Shivsena Options for Government Formation