बाळासाहेबांचा आत्मा तळमळला, धनुष्यबाणावर गद्दारांचा दरोडा, मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न, न्यायाचे धिंडवडे, ‘सामना’तून शब्दांचा उद्रेक!
उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला गेलाय, या आघातानं मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झाल्याची भावना शिवसेना प्रेमींची आहे, असे सामनातून म्हटलंय.
मुंबईः बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) आत्मा आज तळमळतोय.. शिवसेना आणि धनुष्यबाणावर (Bow and arrow ) गद्दारांचा दरोडा पडलाय. महाराष्ट्राचा घात झाला. मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झालंय, अशा शब्दात शिवसेनेचं मुखपत्र सामनातून राजकारणातील सर्वात मोठ्या घडामोडीवर भाष्य करण्यात आलंय. शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांनी गमावल्यानंतर शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून काय भूमिका मांडण्यात आली असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळी आला. त्यामुळे वृत्तपत्रातील अग्रलेखाचा विषय पाकिस्तानातील आर्थिक संकटाचा असला तरीही शिवसेनेतील या भूकंपाची बातमी पहिल्या पानावर प्रकाशित करण्यात आली आहे. या बातमीतूनच शिवसेना आणि ठाकरे गटाच्या संतप्त भावना आणि उद्रेक व्यक्त करण्यात आलाय.
सत्य, न्यायाचे धिंदवडे…
निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वस्वी केंद्र सरकार आणि अमित शाह दोषी असल्याचं सामनातून मांडण्यात आलंय. त्यात लिहिलंय- मोदी-शहांनी लिहिलेल्या पटकथेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने कठपुतळीचा खेळ खेळला आहे. देशात सत्य आणि न्यायाचे अक्षरशः धिंदवडे निघालेत. उघडपणे लोकशाहीचा गळा घोटला गेलाय, या आघातानं मराठी माणसाचं हृदय छिन्नविच्छिन्न झाल्याची भावना शिवसेना प्रेमींची आहे, असे सामनातून म्हटलंय.
अग्रलेखातून काय भूमिका?
सामना वृत्तपत्रातून पाकिस्तानातील आर्थिक संकटावर भाष्य करण्यात आलय. आर्थिक दिवाळखोरीत सापडलेल्या पाकिस्तानात आज एकिकडे गरीब जनता जगण्यासाठी पळापळ करीत आहे आणि दुसरीकडे पाकिस्तानातील श्रीमंत लोकही देशाबाहेर पळून जात आहेत. कालपर्यंत आम्ही अण्वस्त्रसज्ज आहोत, म्हणून हिंदुस्थानावर डोळे वटारणाऱ्या व दहशतवादी कारवाया घडवणाऱ्या पाकिस्तानची आज अशी दिवाळखोर व कंगाल अवस्था झाली आहे. ही पाकिस्तानच्या कर्माचीच फळं असल्याचं भाष्य सामनातून करण्यात आलंय.
कर्माचं फळ
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आधी पाकिस्तानला नव्याने कर्ज देण्यास नकार दिला होता. मात्र पाकिस्तानची अन्नान्न दशा पाहून नाणेनिधीला दया आली. त्यांनी कर्ज देण्याची तयारी दर्शवली. पेट्रोल, डिझेलसह अनेक वस्तूंच्या करांत मोठी वाढ करून करवसुलीच्या माध्यमातून पाकिस्तानने आपला महसूल वाढवण्याची मुख्य अट घातली. त्यामुळेच गेल्या महिनाभरात पेट्रोल ५८ रुपये तर डिझेल ५३ रुपयांनी महागले आहे. या अभूतपूर्व महागाईला तोंड देत जगणाऱ्या पाकिस्तानी जनतेच्या मनात तेथील एकूणच अर्थव्यवस्थेविरुद्ध असंतोष खदखदताना दिसतोय, हा पाकिस्तानच्या कृत्यांचाच परिपाक असल्याचं सामनातून म्हटलं गेलंय.