“आमच्यामुळे तुमच्या जागा वाढल्या, मोठा भाऊ म्हणून खुमखुमी असेल तर…”, ठाकरे गटाकडून काँग्रेसला घरचा आहेर
महाराष्ट्रात आज काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असून, आगामी विधानसभा निवडणुका मविआ एकत्र लढणार आहे, असे विधान काँग्रेसने केले होते. त्यावरुन आता ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिले आहे.
Sanjay Raut On Congress Seat Sharing : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सध्या राज्यातील सर्वत्र पक्ष अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सर्व पक्षांसह नेत्यांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यातच जागावाटप, मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत सातत्याने बिघाडी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी महाराष्ट्रात आज काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असून, आगामी विधानसभा निवडणुका मविआ एकत्र लढणार आहे, असे विधान केले होते. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांना रमेश चेन्नीथला यांच्या काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याच्या वक्तव्यावरुन विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊतांनी महाविकास आघाडीत कोणी लहान भाऊ, मोठा भाऊ असं कोणीही नाही. जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत, उंच भाऊ आहोत, तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचे योगदान किती याचा त्यांनी अभ्यास करायला हवा, अशा शब्दात प्रत्युत्तर दिले.
“महाराष्ट्रात काय चित्र आहे ते भविष्यात कळेल”
“रमेश चेन्नीथला स्वतः म्हणाले होते, महाविकास आघाडीत कोणी लहान भाऊ, मोठा भाऊ असं कोणीही नाही. महाविकासआघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. आम्ही एकत्र निवडणुका लढू. पण आता जर कोणाला अशी खुमखुमी असेल लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, धाकटा भाऊ तर मग महाराष्ट्रात काय चित्र आहे ते भविष्यात कळेल”, असे संजय राऊत म्हणाले.
“काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसला लोकसभेत तीन जागा जास्त मिळालेल्या आहेत. पण त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत, उंच भाऊ आहोत, तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचे योगदान किती याचा त्यांनी अभ्यास करायला हवा. अमरावती, रामटेक , कोल्हापूर या जिंकलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत. या तीन जागा शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या. हे जर ते विसरले असतील किंवा विसरत असतील तर ते योग्य नाही. पण मी परत सांगतो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशाप्रकारची भूमिका घेणार नाही”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
“त्याबद्दलचा अभ्यास करावा लागेल”
“कोणाचा एकट्याचा आत्मविश्वास वाढलेला नाही तर महाविकासआघाडीतील सर्वांचाच आत्मविश्वास वाढलेला आहे. तो लोकसभेचा आत्मविश्वास होता. विधानसभेच्या आत्मविश्वासावर परत आपल्याला काम करावं लागेल. त्यासाठी तिन्हीही पक्षांनी एकत्र राहावं लागले. आत्मविश्वास वाढला म्हणून ते वेगळे लढणार नाही ना. तीन पक्ष एकत्र आल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल. महाविकासाआघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास कसा वाढेल. जर असा वाढला असं कोणाला वाटत असेल, त्यांचा आत्मविश्वास कोण काय कशाबद्दलचा आहे, त्याबद्दलचा अभ्यास करावा लागेल”, असेही संजय राऊत म्हणाले.
“विधानसभेलाही तिन्हीही पक्ष एकत्र लढू”
“आम्ही लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही तिन्हीही पक्ष एकत्र लढू. लोकसभेला जागावाटप हे सोपं होतं कारण ४८ जागांची चर्चा करायची होती. आता २८८ जागा आहेत. तीन प्रमुख पक्ष, मित्र पक्ष या सर्वांना सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे देखील एकत्र येऊन याबद्दल चर्चा करतील”, असेही संजय राऊत म्हणाले.