“सुषमा अंधारेंना शिवसेना किती माहिती आहे?” यामिनी जाधव यांचा सवाल, म्हणाल्या “बाळासाहेब ठाकरेंनी…”
जी महिला आघाडी बाळासाहेब ठाकरेंनी रणरागिणी म्हणून निर्माण केली, ती महिला आघाडी आता सुषमा अंधारेंची पर्स सांभाळते, त्यांना पाण्याची बॉटल देत आहे, अशा घणाघात यामिनी जाधव यांनी केला.
MLA Yamini Jadhav Sushma Andhare : मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनी मुस्लिम महिलांना बुरखा वाटप केले. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. आता याप्रकरणानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी जोरदार टीका केली होती. कुणाच्या लांगुलचालनासाठी बुरखा वाटप करताय? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केला होता. त्यावर आता यामिनी जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यामिनी जाधव यांनी नुकतंच ‘टीव्ही 9 मराठी’शी Exclusive बातचीत केली. यावेळी त्यांनी बुरखा वाटप कार्यक्रमामुळे झालेल्या टीकेवर भाष्य केले. तसेच त्यांनी सुषमा अंधारेंवरही निशाणा साधला. “ज्या सुषमा अंधारे माझ्यावर टीका करत आहेत, त्यांना शिवसेना किती माहिती आहे?” असा प्रश्न यामिनी जाधव यांनी विचारला आहे.
“त्यांना शिवसेनेत किती वर्ष झाली, कोण आहेत या बाई?”
“ज्या सुषमा अंधारे माझ्यावर टीका करत आहेत, त्यांना शिवसेना किती माहिती आहे. त्यांना शिवसेनेत किती वर्ष झाली, कोण आहेत या बाई? ज्या बाईंनी बाळासाहेब ठाकरेंना अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या होत्या, आदित्य ठाकरेंवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. जी महिला आघाडी बाळासाहेब ठाकरेंनी रणरागिणी म्हणून निर्माण केली, ती महिला आघाडी आता सुषमा अंधारेंची पर्स सांभाळते, त्यांना पाण्याची बॉटल देत आहे, अशा घणाघात यामिनी जाधव यांनी केला.
“हे तुम्हाला कितपत पटतं आहे”
“सुषमा अंधारे या इतक्या मोठ्या कधी झाल्या? त्या जर आम्हाला गद्दार म्हणत असतील तर मग त्याही कोणत्या तरी पक्षात होत्या. एखादा पक्ष बदलणे हे म्हणजे गद्दार होतं का? मी तर अद्याप पक्ष बदलेला नाही. मी आजही शिवसेनेत आहे. त्या मूळच्या शिवसैनिक आहेत का? त्या म्हणतात बाळासाहेबांनी आम्हाला झेंडा दिला, कधी दिला, कोणत्या साली दिला? ज्या व्यक्तीने तुमच्या दैवताला इतक्या अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या होता, त्याच्यासोबतच तुम्ही बसताय. हे तुम्हाला कितपत पटतं आहे”, असेही यामिनी जाधव यांनी म्हटले.
“माझं हिंदूत्व कुठेतरी नुकसानकारक होतं का?”
मी स्वत: सांगते, हो आम्ही मुस्लिम धर्मावरही प्रेम करतो. जुलूस असतानाही काही योजनांची घोषणा केली होती, मग त्यावेळी कोणी का प्रश्न उपस्थित केला नाही? तेव्हा तुम्हाला मुस्लिम समाजाची मतं महत्त्वाची वाटत होती का? आज आम्ही मुस्लिम महिलांच्या समाजासाठी बुरखा वाटप केले, तर मग त्यात इतकं वावगं वाटण्यासारखं काय आहे? माझ्या मतदारसंघातील अनेक धर्मांच्या कार्यक्रमाला उपस्थित असते. मग माझं हिंदूत्व कुठेतरी नुकसानकारक होतं का? सुषमा अंधारेंनी यात काही बोलू नये, अशी टीका यामिनी जाधव यांनी केली.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?
मुस्लिम समाजाने आम्हाला मतदान केलं नाही आणि त्यांच्यासोबत नवनवे हिंदूत्ववादाने पछाडलेले शिंदे सेनेसोबत गेलेले लोक अनेक दिवसांपासून ओरडत होते. महाविकासाघाडीला फक्त मुस्लिम लोकांची मतं मिळाली असे ते ओरडत होते. तुम्ही हिरव्या मतावर निवडून आले आहात, आम्हाला या हिरव्या मताची गरज नाही. आम्ही हिरव्या मतांसाठी राजकारण करणार नाही. पण यामिनी जाधव या बुरखा वाटपचा कार्यक्रम घेतात ते कोणाच्या लांगुनचालनासाठी बुरखा वाटप करतात? असे सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या.