आदित्य ठाकरे यांचा मोठा आरोप, शिंदे सरकारची त्या 5 कंत्राटदारांवर मेहेरनजर
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर मोठा आरोप केला. कंत्राटदारांना मदतनिधी देऊन स्वतःचे खिसे भरण्याचे काम सुरु आहे. राज्यात आमचे सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आजी, माजी आयुक्त असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार आणि मुंबईचे पालिका आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात आमचे सरकार पुन्हा येणार आहे. आम्ही आजी, माजी आयुक्त असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. ब्लॅकलिस्ट झालेल्या कंत्राटदाराना मोठे काम देण्यात आले. पालिका, एमएमआरडीए हे खड्डे बुजविण्यासाठी कंत्राटदारांना पैसे देत आहे. पण, कर्मचाऱ्यांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. दोन्ही बजेटमध्ये शून्य पैसे दिले. मग, कंत्राटदारांवर उधळपट्टी का करत आहात, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
मिंधे सरकारकडून महाराष्ट्राची लुट सुरु आहे. 15 जानेवारी 2023 रोजी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आजही पुन्हा सांगतो की 1 टक्के काँक्रीटचे रस्ते अजूनही झाले नाही. एका कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केले. त्याला दंड आकारला. पण, तो दंड त्याच्याकडून आला का याचे उत्तर अजूनही दिले नाही. आम्ही हा विषय समोर आणला. त्यानंतर हे टेंडर सव्वापाच हजार करोडपर्यंत आणले. त्याचेही अडवांस मोबाईलायजेशन दिला अशी माहिती मिळते. असे कधी झाले नव्हते. यावर्षी परत नवीन टेंडर काढले आहे. यात 5 कंत्राटदारांना मदतनिधी काढण्याचे काम सुरू आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
शिंदे सरकारचे स्वतःचे खिसे भरण्याचे काम होत आहे का? किती कामे पूर्ण झाली हे आम्हाला जाहीर दाखवा. किती लोकांना पेनल्टी मारली आणि किती पेनल्टी घेतली जे जनतेसमोर आणा. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी कंत्राटदार कुठे दिसत नाही. पण, पोलीस खड्डे भरत आहेत अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
कोकण महामार्ग हा नेशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंतर्गत हा रस्ता येतो. पण त्याचे काम अजूनही पूर्ण होत नाही. एवढा महाराष्ट्र द्वेष कशाला आहे. आम्हाला सांगितले होते की कोकणात जाताना खड्डे दिसतात ते भरले जातील. पण, ते खड्डे भरले गेले नाहीत. त्यामुळे गडकरी यांना विनंती आहे की हेलिकॉप्टर किंवा गाडीने फिरून पाहा. मुख्यमंत्री यांच्याकडे खाते आहे त्या समृद्धी महामार्गावर अपघात होत आहे. खड्डे पडत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.