कुणाकुणाची माफी मागाल? माफी मागतानाची मग्रुरी मान्य आहे काय?; उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींवर बरसले
मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरात जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
Uddhav Thackeray Speech : “निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते मोदी गॅरंटी आहे. हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्घव ठाकरे यांनी केला. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्यानंतर महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते आज रस्त्यावर उतरले. महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून आज जोडे मारा आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया परिसरात जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
महाविकासआघाडी या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले आहे. या आंदोलनात महाविकासाआघाडीचे अनेक समर्थक जमलेले पाहायला मिळत आहे. या आंदोलनाची सांगता करताना उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीच्या सर्वच नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.
“मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल”
एक फूल दोन हाफ होते. एक हाफ तर नाचत होता. मोदींनी माफी कशासाठी मागितली. पुतळा पडला म्हणून माफी मागितली की पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली. भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्यासाठी मागितली. मोदी तुम्ही आला. निवडणुकीसाठी आला होताच. आम्हाला अभिमान वाटला होता. नौदल दिन महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर होतोय याचा आनंद वाटला. तेव्हा घाईत पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते मोदी गॅरंटी आहे. हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही”
“माफी तुम्ही कुणाकुणाची मागणार. भ्रष्टाचाराने पुतळा कोसळला त्याची माफी मागणार, राममंदिर गळतंय त्याची माफी मागणार, की घाई गडबडीने बांधलेलं संसद गळतंय म्हणून माफी मागणार, दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळतंय, पूल कोसळतंय. कशाकशाची माफी मागणार. महाराजांची माफी मग्रुरीने मागून चालणार नाही”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
महाराष्ट्र शिवद्रोहींना कधी माफ करत नाही
“हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान आहे. महाराष्ट्र धर्माचा अपमान आहे. महाराष्ट्र शिवद्रोहींना कधी माफ करत नाही. करणार नाही. हे दाखवून देण्यासाठी जमलो आहोत. ही जाग आली आहे ती कायम ठेवा. या महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया करून दाखवल्याशिवाय राहू नका” असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.