“घालीन लोटांगण, वंदिन चरण”, सभेपूर्वी विरोधकांनी उद्धव ठाकरेंना डिवचले; ठाण्यात बॅनरबाजी

| Updated on: Aug 10, 2024 | 11:47 AM

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने ठाण्यात बॅनरबाजी केली होती. त्यावर “पक्ष कोणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, काय आहे हिंदुत्व?” असा आशय लिहिण्यात आला होता.

घालीन लोटांगण, वंदिन चरण, सभेपूर्वी विरोधकांनी उद्धव ठाकरेंना डिवचले; ठाण्यात बॅनरबाजी
Follow us on

Thane Banner against Uddhav Thackeray : येत्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांसह मनसेकडूनही विधानसभेची जोरदार तयारी सुरु आहे. त्यासोबतच आता पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी विविध मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाण्यात एक सभा पार पडणार आहे. मात्र या सभेपूर्वीच ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

बॅनरद्वारे ठाकरे गटावर टीका

ठाण्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. या सभेपूर्वी ठाण्यातील दमानी इस्टेट, तीन हातनाका पेट्रोल पंपाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरद्वारे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ठाण्यात झळकणाऱ्या या बॅनरवर एक व्यंगचित्र पाहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

“घालीन लोटांगण, वंदिन चरण”

या व्यंगचित्रात एका बाजूला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी दिसत आहेत. त्याखाली दिल्ली असे लिहिण्यात आले आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे पाहायला मिळत आहे. यात उद्धव ठाकरे हे राहुल गांधींसमोर लोटांगण घालत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यासोबतच या बॅनरवर घालीन लोटांगण, वंदिन चरण, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाची बॅनरबाजी

ठाण्यात झळकणारे हे बॅनर नक्की कोणी लावेल, अशी चर्चा सध्या रंगली आहे. तसेच यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार टीकाही केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने ठाण्यात बॅनरबाजी केली होती. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळत आहे. त्यासोबतच यावर लिहिलेल्या मजकुराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. “पक्ष कोणी चोरला, दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, काय आहे हिंदुत्व?” असा आशय या बॅनरवर पाहायला मिळत आहे.