भाजप विरुद्ध शिवसेना लढतीचे निकाल काय?
कणकवली आणि माण या दोन जागांवर शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्येच थेट लढत झाली होती, या दोन्ही जागांवर भाजपने बाजी मारली
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वी युती केली असली, तरी राज्यातील दोन जागांवर शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमध्येच थेट लढत (Shivsena VS BJP election result) झाली होती. सिंधुदुर्गातील कणकवली (Kankavli) आणि साताऱ्यातील माण (Maan) मतदारसंघामध्ये सेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये लढत झाली होती. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणांवर भाजपने शिवसेनेवर मात केली आहे.
कणकवली मतदारसंघात काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या नितेश राणे यांना तिकीट मिळालं होतं. मात्र राणे कुटुंबाशी शिवसेनेचं जुनं वैर असल्यामुळे सेनेने आपला उमेदवारही या मतदारसंघातून रिंगणात उतरवला. सतीश सावंत हे कणकवलीतून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते.
नितेश राणे कणकवलीतून 28 हजार 116 च्या मताधिक्याने निवडून आले. सतीश सावंत हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले असून त्यांना 56 हजार 171 मतांवर समाधान मानावं लागलं.
नितेश राणेंनी काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांना मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर राणे कुटुंबातच कलह निर्माण झाला होता. आदित्य ठाकरे यांनी विधीमंडळात येण्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे, असं नितेश राणे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. आता नितेश राणेंची बार्गेनिंग पॉवर वाढल्यामुळे भाजप सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
माण विधानसभा : एक भाऊ भाजपात, दुसरा शिवसेनेत; जयकुमार गोरेंसमोर तगडं आव्हान
माण विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या जयकुमार गोरे यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे त्यांनी पराभूत केलेले शिवसेनेचे उमेदवार हे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे (Shivsena VS BJP election result) होते.
शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे सख्खे भाऊ पक्के वैरी होऊन माण विधानसभा मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. 2014 मधील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर जयकुमार गोरे आणि रासपमधून निवडणूक लढवलेले शेखर गोरे यांच्यात चांगलीच लढत झाली, तेव्हाही जयकुमार गोरेंनी बाजी मारली होती. आता जयकुमार काँग्रेसमधून भाजपवासी झाले, तर शेखर गोरे हे रासपमधून राष्ट्रवादीमार्गे शिवसेनेत गेले.