मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा मावळा’ या चिन्हावर शिवसेनेला समाधान मानावं लागलं. पण मध्य प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना धनुष्यबाण या आपल्या पारंपरिक चिन्हासह उतरणार आहे. तशी माहिती शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी दिली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला निवडणूक आयोगानं सुरुवातीला बिस्किट हे चिन्ह दिलं होतं. त्याला शिवसेनेनं आक्षेप घेतला. त्यानंतर शिवसेनेला साजेसं ‘तुतारी वाजवणारा मावळा’ हे चिन्ह मिळालं आहे. (Shivsena will contest election with Danushyaban in MP)
तिकडे मध्यप्रदेशात काँग्रेसच्या २७ आमदारांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. तर एका आमदाराच्या मृत्यूमुळे मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या सर्व जागांवर शिवसेना निवडणूक लढवत भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहे. मध्यप्रदेश पोटनिवडणुकीसाठी ३ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्याबाहेर पक्षाची ताकद वाढवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे.
NDAतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी ५० जागा लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्टार प्रचारकांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह चंद्रकांत खैरे, सुभाष देसाई यांचा समावेश आहे.
बिहार आणि मध्य प्रदेश विधानसभेच्या रिंगणात शिवसेना उतरली आहे. त्यामुळे दोन हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. याचा फायदा काँग्रेसला काही प्रमाणात तरी होणार का? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये असताना शिवसेना राज्याबाहेर स्वतंत्रपणे निवडणूक लढवायची. आताही तशीच लढत आहोत. पुढे मागे पक्षनेतृत्वानं निर्णय घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार असल्याचंही अनिल देसाई म्हणाले.
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर दुसरीकडे आरजेडी आणि काँग्रेस यांची आघाडी त्यांना टक्कर देण्यासाठी मैदानात आहेत. तर एलजेपीचे नेते चिराग पासवान यांनी जेडीयूशी फारकत घेत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी ‘बिहारच्या जनतेच्या हितासाठी मी सदैव कार्यरत राहील. जनतेसाठी जीवाचं रान करीन. राज्याच्या प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही’ अशी गर्जना केलीय. त्यामुळं ही निवडणूक रंगतदार होणार हे आता स्पष्ट झालंय.
संबंधित बातम्या:
‘बिहारच्या जनतेसाठी जीवाचं रान करीन’, लालूंच्या सुपुत्राचा निवडणूक अर्ज दाखल
…म्हणून बिहारच्या या गावात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला ‘नो एन्ट्री’!
Shivsena will contest election with Danushyaban in MP