एबी फॉर्मसाठी दिवसभर ‘मातोश्री’वर, रश्मी बागल रिकाम्या हाती परतल्या
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उद्या (मंगळवार) परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल (AB Form Rashmi Bagal) यांनी दिलं. विद्यमान आमदार नारायण आबा पाटलांनी 'मातोश्री'वर येऊन रश्मी बागल यांना विरोध केला होता.
मुंबई : राष्ट्रवादीतून आलेल्या रश्मी बागल यांच्या संदर्भात शिवसेनेने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. ‘मातोश्री’वर सकाळपासून आलेल्या रश्मी बागल (AB Form Rashmi Bagal) अखेर रात्री रिकाम्या हाताने परतल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उद्या (मंगळवार) परत यायला सांगितल्याचं स्पष्टीकरण रश्मी बागल (AB Form Rashmi Bagal) यांनी दिलं. विद्यमान आमदार नारायण आबा पाटलांनी ‘मातोश्री’वर येऊन रश्मी बागल यांना विरोध केला होता.
रश्मी बागल यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. पण स्थानिक शिवसेना आमदाराची यामुळे नाराजी ओढावली आहे. मला तिकीट न मिळाल्यास माझा समाज शिवसेनेला धडा शिकवेल, असंही नारायण पाटील म्हणाले होते. शिवाय त्यांनी त्यांची भूमिका पक्षासमोरही मांडली होती.
तिकिटाबाबत मी आशावादी नाही, तर मला खात्री आहे की उद्धव साहेब मला उमेदवारी देतील. मला शिवसैनिकांचा विरोध नाही, उलट मी प्रवेश केला तेव्हा करमाळ्यात शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं होतं, अशी प्रतिक्रिया रश्मी बागल यांनी दिली.
विद्यमान आमदाराकडून बंडखोरीची भाषा
सोलापुरात शिवसनेच्या वतीने नव्यानेच पक्षात आलेल्या नेत्यांचा आणि आजी-माजी नेत्यांचा मनोमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एरवी एकमेकांविरोधात शड्डू ठोकणारे नेते एकाच मंचावर पाहायला मिळाले. मात्र या मेळाव्यात चर्चा रंगली ती करमाळ्याच्या राजकारणाची.. करमाळ्याचे आमदार नारायण पाटलांचा पत्ता कट करून रश्मी बागलांना तिकीट देण्याची चर्चा सुरु आहे. रश्मी बागलांनी जाहीर सभेत राजकारणात प्रत्येकाच्या अपेक्षा असतात असं सांगत अप्रत्यक्षपणे विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीवर दावा केला.
युतीच्या जागावाटपात करमाळ्याची जागा शिवसनेकडे आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार शिवसेनेचा असताना रश्मी बागलांनी शिवसेनेची निवड का केली? रश्मी बागल कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता लागलेली होती. त्यातच खुद्द रश्मी बागलांनी आगामी निवडणूक करमाळ्यातून लढविण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे नवा वाद पेटला. रश्मी बागलांना उमेदवारी दिली तर थेट बंडखोरीची भाषा विद्यमान आमदारांनी केली. उमेदवारी डावलली तर धनगर समाज पक्षालाच धडा शिकवेल, असा सूचक इशारा नारायण पाटील यांनी शिवसेनेला दिला.
संबंधित बातम्या :