महाराष्ट्रात किस्सा कुर्सी का पेटला, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर मुलगा.. पहा कोण-काय म्हणालं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आज दुपारी एक फोटो ट्विट केला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे बसलेले दिसतायत. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पुत्र कारभार चालवतात का, असा प्रश्न यावरून उपस्थित केला जातोय.
मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बसल्याचा फोटो व्हायरल झाल्याने चांगलाच वादंग माजलाय. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पुत्र राज्याचा कारभार पाहतात का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी श्रीकांत शिंदे यांचा हा फोटो ट्विट केला. त्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय.
रविकांत वरपेंचं ट्विट काय?
रविकांत वरपे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दीक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्याचे चिरंजीव कारभार सांभाळतात. हा कोणता राजधर्म? असा कसा हा धर्मवीर?… अशी टीका वरपे यांनी केलीय..
पहा ट्विट-
खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात.लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय.हा कोणता राजधर्म आहे?असा कसा हा धर्मवीर?@mieknathshinde @DrSEShinde pic.twitter.com/rpOZimHnxL
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 23, 2022
आदित्य असे वागले नाहीत…
शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही हल्ला बोल केलाय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणं हा अपराध आहे. आदित्य ठाकरे असं कधीही वागले नाहीत… असं वक्तव्य त्यांनी केलंय.
पाहा कायंदे काय म्हणाल्यात?
सचिन खरातांची टीका
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष (खरात) सचिन खरात म्हणाले, राजा का बेटा राजा.. चालणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. आदित्य ठाकरेंना मंत्रिपद मिळाल्यावर यांनीच आक्षेप घेतला होता. आता श्रीकांत शिंदेंच्या या फोटोनंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असं वक्तव्य त्यांनी केलंय.
मुनगंटीवार काय म्हणाले?
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणाले, ‘ शिवसेनेचा नेता राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी कशा पद्धतीने धावत गेला, हेही महाराष्ट्राने पाहिलंय. शिवसेना प्रमुख आणि त्यांचे सुपुत्र सोनियांजींच्या समोर किती वाकून अभिवादन होते, हेही पाहिलंय. आता अडीच वर्षात काय केलंय हे सांगण्यासारखं नसल्यानं एखाद्या बैठकीत कुणीही बसलं तर आक्षेपार्ह काहीच नाही… असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय.