औरंगाबाद : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप 2 वर्षे बाकी आहेत. अशावेळी मावळ लोकसभा मतदारसंघावरुन (Maval Lok Sabha constituency) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आतापासूनच जोरदार लॉबिंग सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजिव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी नशीब आजमावून पाहिलं होतं. मात्र, शिवसेनेच्या श्रीरंग बारणे (Shriranga Barne) यांनी पार्थ यांचा जवळपास सव्वा दोन लाखाच्या फरकाने पराभव केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पार्थ पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून लॉबिंग सुरु करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दूजाभाव केला जातोय. निधी वाटपातही दूजाभाव होतोय. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की ती करायला लावली हे शोधलं पाहिजे. ज्यांनी ही मागणी केली ते कोण आहेत, त्यांना मी ओळखत नाही. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असा गंभीर आरोप बारणे यांनी केलाय.
पार्थ पवार यांचा सोमवारी (21 मार्च) ला वाढदिवस पार पडला. पार्थ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन देशमुख यांनी पार्थ पवार यांच्यासाठी शिवसेनेनं मावळ मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावा, अशी मागणी केलीय. याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता, रोहित यांनीही सूचक वक्तव्य केलंय. पार्थ पवार यांनी जर स्वत: मावळ मतदारसंघाची मागणी केली तर शेवटपर्यंत पाठपुरावा करण्यापासून ते त्यांच्या मतदारसंघात प्रचाराला सर्वात आधी मी असेन, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीत चर्चेला उधाण आलंय.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची मागणी फेटाळून लावलीय. मावळचे श्रीरंग आप्पा बारणे खासदार आहेत आणि तेच राहतील. पार्थ पवार तरुण आहे, त्यांचा विचार त्यांचा पक्ष करेल. आमच्याकडे काही प्रस्ताव आला तर त्यावर बोलू, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.
इतर बातम्या :