‘या’ नेत्याच्या सभेसाठी आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली, अब्दुल सत्तार यांची खेळी?; पुढे काय?
आदित्य ठाकरे यांना महावीर चौका ऐवजी इतर ठिकाणी सभा घेण्याची सूचना नगर परिषदेने केली आहे. विशेष म्हणजे सिल्लोड नगर परिषद सत्तार यांच्या ताब्यात आहे.
औरंगाबाद: ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या सिल्लोडमधील सभेला (rally) परवानगी नाकारण्यात आली आहे. सिल्लोड नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. विशेष म्हणजे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्या ताब्यात ही नगर परिषद आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सभेला नगर परिषदेने परवानगी नाकारल्याने त्याकडे राजकीय दृष्टीकोणातून पाहिले जात असून त्यावरून सिल्लोडचं राजकारण तापताना दिसत आहे.
आदित्य ठाकरे यांची सिल्लोडच्या महावीर चौकात सभा होणार होती. या सभेसाठी ठाकरे गटाने रितसर नगर परिषदेकडे परवानगी मागितली. मात्र नगर परिषदेने ही परवानगी नाकारली आहे. त्यासाठी नगर परिषदेने एका बड्या नेत्याच्या सभेचं कारण दिलं आहे.
हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव, खासदार श्रीकांत शिंदे यांचीही सभा सिल्लोडला होणार आहे. श्रीकांत शिंदे यांची सभा झेडपी ग्राऊंडवर होणार आहे. झेडपी ग्राऊंड आणि महावीर चौक समोरासमोरच आहे.
शिवाय श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांची सभा एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची सभा समोरासमोर होत असल्याने नगर परिषदेने आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली आहे.
आदित्य ठाकरे यांची सभा 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता भगवान महावीर चौकात होणार आहे. आदित्य ठाकरे यांचीही शिवसंवाद यात्रा आहे. तर श्रीकांत शिंदे यांचीही सभा 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार आहे. ही सभा जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात होणार आहे.
आदित्य ठाकरे यांना महावीर चौका ऐवजी इतर ठिकाणी सभा घेण्याची सूचना नगर परिषदेने केली आहे. विशेष म्हणजे सिल्लोड नगर परिषद सत्तार यांच्या ताब्यात आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, ठाकरे गट आता सभेचं ठिकाण बदलणार की नगर परिषदेची परवानगी झुगारून आहे त्या ठिकाणी सभा घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच दोन्ही नेत्यांच्या एकाच दिवशी सभा होत असल्याने सिल्लोडमध्ये कुणाचं शक्तीप्रदर्शन सर्वाधिक होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
श्रीकांत शिंदे यांची सभा न भूतो न भविष्यती करण्यासाठी सत्तार यांनी सर्व शक्ती पणाला लावल्याचं सांगितलं जात आहे. या सभेची सत्तार यांनी जोरदार तयारी सुरू केल्याने या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.