सिंधुदुर्ग : भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्याला आता ठाकरे गटाच्या वतीने उत्तर देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. संजय राऊत नवीन संसदेची पायरी चढणार नाही, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे. यावर बोलताना यावर बोलताना वैभव नाईक यांनी, संजय राऊत आतापर्यंत चार वेळा खासदार झाले. तेही एकाच पक्षातून खासदार झाले.मात्र राणे कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी झाले, असं वैभव नाईक म्हणाले.
भाजपला आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याची खुमखुमी आहे. ईडीला सगळेच सामोरे गेले. मात्र ईडीच्या भीतीने राणे भाजपमध्ये गेले. त्यामुळे नितेश राणेंना कर नाही त्याला डर कसला हे बोलण्याचा अधिकार नाही, अशी टीका वैभव नाईक यांनी केलीय.
अधिकृत जागा वाटपावरून आघाडीत अजूनही चर्चा नसताना नितेश राणे त्यावर बोलतात. मात्र 2019 ला नितेश राणेंचा स्वाभिमान पक्षाला कोणी विचारलं नाही. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला डमेज करण्यासाठी बंडखोर उमेदवार अनेक ठिकाणी उभे केले. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आमचे तिन्ही पक्ष मैदानात आहेत, असं वैभव नाईक म्हणालेत.
निष्कलंक असलेल्या जयंत पाटील यांच्यावर अश्या प्रकारे ईडीच्या नोटिसा पाठवून त्रास दिला जात आहे. मात्र त्यांच्या सोबत असलेल्या जनता रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्या भावना नितेश राणेंना समजणार नाहीत, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांच्या ईडीच्या चौकशी संदर्भात वैभव नाईक यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि मातोश्री दोन बांधलं. मात्र बाळासाहेबांचं स्मारक बाधू शकले नाहीत, अशी बोचरी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली. यावर वैभव नाईक यांनी बाळासाहेबांच्या स्मारक संदर्भात सर्व बाबी पूर्ण झाल्या आहेत. लवकरच बाळासाहेबांचं भव्य दिव्य स्मारक बांधण्यात येणार आहे, असं वैभव नाईक म्हणालेत.