“स्पेशल खुर्चीपासून सोफ्यापर्यंत उद्धव ठाकरे यांचा प्रवास संजय राऊतांमुळे, आता स्टुलवर आणतील”
Nitesh Rane on Uddhav Thackeray Sanjay Raut : भाजप नेत्याची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका; वाचा...
सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. तसंच ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघात केलाय. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीवर आणि उद्धव ठाकरेंना मिळालेल्या वागणुकीवर नितेश राणे यांनी भाष्य केलंय. तसंच संजय राऊत महाविकास आघाडीतील शकुनीमामा असल्याचंही नितेश राणे म्हणालेत.
ठाकरेंना मिळालेल्या वागणुकीवर भाष्य
“काल सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची सभा झाली. त्याचे फोटो व्हायरल झालेत. बाळासाहेब ठाकरेंचा एक वेगळा रुबाब होता. मोठ्यातला मोठा नेता, कलाकार मातोश्रीवर यायचा. बाळासाहेब ठाकरे यांना नमस्कार करायचा आणि मगच मुंबईत यायचा. पण काल उद्धव ठाकरेंना काल सिल्हर ओकवर जी वागणूक मिळाली त्यावर त्यांनी विचार करावा. भाजपा सोबत असताना उद्धव ठाकरेंना जो मान होता. तो काल दिसला नाही, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंची अवस्था मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आली. संजय राऊत यांच्यासारख्या लोकांच्या नादी लागल्याने तुमची अवस्था काय झाली बघा. सोफ्यावरून तुम्ही स्टूलवर याल अशी आम्हाला भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंजवळ नेता उरला नाही कामगार न्यावा लागतो. ही उरलेल्या उद्धव सेनेची अवस्था आहे, असं नितेश राणे म्हणालेत.
कर्नाटक निवडणुकीवरून संजय राऊत यांनी काँग्रेसची इज्जत काढली आहे. एकट्या काँग्रेस चा हा विजय नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हा अपमान नाना पटोले यांना मान्य आहे का? संजय राऊत महाविकास आघाडीतील शकुनीमामा अन् नारदमुनी. भांडणं लावणं राऊतांचं काम…, असं नितेश राणे म्हणालेत.
कर्नाटक मध्ये कोण जिंकले हा प्रश्न पडतोय. पाकिस्तानचा हा विजय आहे का? पाकिस्तानचं राज्य कर्नाटकमध्ये आलंय ही भीती निर्माण करायची आहे का? हिरवे झेंडे फडकवले गेले यावर बाळासाहेब ठाकरेंनी काय लिहिलं असतं याचा विचार राऊतने करावा. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात झालेल्या दोन दंगली विषयी भाष्य करायला हवं होतं. उलट ते गृहमंत्र्यांवर टीका करत आहेत, असं नितेश राणे म्हणालेत.