“संजय राऊतांना इतिहास माहिती असता तर ‘असं’ बोलण्याची हिंमत केलं नसती”
Nitesh Rane on Sanjay Raut : सामनातून संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा; भाजप नेत्याचा पलटवार
मुंबई : आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे. यावेळी व्लादीमीर पुतीन आणि वॅगनर ग्रुपचाही उल्लेख करत आजच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. याला भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत यांच्यावर नितेश राणे यांनी निशाणा साधला आहे.
संजय राऊतला वॅगनर ग्रुपचा इतिहास माहीत तरी आहे काय? थोडी माहिती घेतली असती तर विरोधकांच्या पटना बैठकीला वॅगनर ग्रुप म्हणायची हिंमत झाली नसती, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
संजय राऊत घरफोड्या आहे. वॅगनर ग्रुपचा लीडर नाझी विचारसरणीचा होता.संजय राऊतला पाटण्यात भेटलेले मित्र पक्ष आणि त्याचे नेते पण नाझी विचारसरणीचे आहेत असं त्यांना म्हणायचं आहे का?,असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात काय?
सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. पुतीन यांनाही धक्का दिला जाऊ शकतो व हुकूमशहाची घाबरगुंडी उडते हे वॅगनर बंडाच्या रूपाने जगाने पाहिले. अर्थात कोणत्याही हुकूमशाहीला असा हादरा कधी ना कधी बसत असतो . पुतीन असो की मोदी , त्यांना बंडाचा सामना करावाच लागतो . हिंदुस्थानातील सत्ता ही अहिंसक ‘ वॅगनर ‘ मार्गानेच उलथवली जाईल व तो मार्ग मतपेटीचा आहे . पाटण्यात मोदी यांच्या सत्तेस आव्हान देणारा लोकशाही संरक्षक ‘ वॅगनर ग्रुप ‘ एकत्र आला . हा ग्रुप भाडोत्री नाही हे महत्त्वाचे . पुतीन यांच्याप्रमाणेच मोदी यांना जावे लागेल , पण लोकशाही मार्गाने . पाटण्यातील ‘ वॅगनर ग्रुप ‘ ने तोच इशारा दिला!, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.
ठाकरे, राऊतांवर निशाणा
नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचा इतिहास आहे. जे जे त्यांना आडवे आले त्यांना त्यांनी संपवलं आहे, असा गंभीर आरोपदेखील नितेश राणे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे स्वतः सूरज चव्हाणला भेटायला गेले. दिशा सालियानच्या हत्येनंतर काही लोक सुशांत सिंगला भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर काहीच दिवसात सुशांत सिंगची हत्या झाली.असंच काही सूरज चव्हाण बाबत घडणार नाही ना?, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
मातोश्री पासून हाकेच्या अंतरावर असलेली शाखा तोडली जाते आणि अनिल परब आणि लोक शेंबड्या पोरांसारखे मोर्चा काढत आहेत, असंही ते म्हणालेत.
संजय राऊतच्या बुद्धीचे कौतुक करतो. हा स्वतःच्या मालकाचा वाभाडा काढणारा हा कामगार आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंना पूर्वी किती मानसन्मान मिळायचा आणि पाटण्यात किती मिळाला? एका कोपऱ्यात मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला उद्धव ठाकरेला बसवण्यात आलं होतं, असं म्हणत नितेश राणे यांनी पटनामध्ये झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीवर भाष्य केलंय.