नाशिक : सिन्नर नगरपरिषदेत पारनेरची पुनरावृत्ती झाल्याचे चित्र असून पुन्हा एकदा राष्ट्रवादीने शिवसेनेला धक्का दिला. नाशिकमधील सिन्नर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे पाच नगरसेवक फुटले. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना बंडखोरालाच निवडून आणले. (Sinnar Nagar Parishad Election NCP MLA Manikrao Kokate supports Shivsena Rebel)
पारनेरमधील राजकारणावरुन उडालेला धुरळा शांत होत नाही, तोच सिन्नर नगरपरिषदेत याची पुनरावृत्ती घडली. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांच्या गटाने शिवसेनेचे 5 नगरसेवक फोडले.
उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रणाली गोळेसर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे शिवसेनेच्या बाळासाहेब उगले यांनी बंडखोरी करत त्यांच्याविरोधात अर्ज भरला.
हेही वाचा : शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले?
बाळासाहेब उगले यांनी बुधवारी झालेल्या निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे गटाच्या सहाय्याने पंधरा मते मिळवली. तर प्रणाली गोळेसर यांना 14 मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी पक्षाविरोधात मतदान केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
VIDEO : Nashik | सिन्नर नगरपरिषदेत पारनेरची पुनरावृत्ती? राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का https://t.co/QRIhslnj6c
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2020
पारनेरमध्ये नेमकं काय झाले?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला होता. शिवसेनेला रामराम ठोकत पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवार यांना संपर्क साधत निरोप पाठवल्याचे बोलले जात होते. “पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत” असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना पाठवल्याचे बोलले जाते.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
पारनेरच्या या नगरसेवकांची चारच दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर हे नगरसेवक शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले होते, त्याच लंके यांच्या उपस्थितीमध्ये या नगरसेवकांनी मातोश्रीवर पुन्हा शिवबंधन हाती बांधले. (Sinnar Nagar Parishad Election NCP MLA Manikrao Kokate supports Shivsena Rebel)